केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर देशभरातील अल्पसंख्याक व्होटबँकेने स्वत:च्या भूमिकांबाबत पुनर्वचिार करण्यास सुरुवात केली आहे. या पाश्र्वभूमीवर राज्यातील संभाव्य युतीमध्ये राहणाऱ्या शिवसेनेला अल्पसंख्याक व्होटबँकेची नाराजी भोवण्याची शक्यता आहे. दापोलीसारख्या मतदारसंघात अशी नाराजी शिवसेनेसाठी धोकादायक असल्याने पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये भाजपशी मत्री होण्यास विरोधाचा सूर आहे.
गेल्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत आमदार सूर्यकांत दळवी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला अनुकूलता दाखवणारी अल्पसंख्याक व्होटबँक महप्रयासाने शिवसेनेच्या बाजूने आणली आहे. दापोलीच्या नगराध्यक्षपदासाठी पक्षाकडून जावेद मणियार यांच्या नावावर झालेले शिक्कामोर्तब पक्षाच्या त्याच अल्पसंख्याक अनुकूलतेचे द्योतक ठरले आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये दुय्यम वागणून मिळणाऱ्या अनेक नेत्यांकडून शिवसेनेला अनुकूलता वाढत चालली आहे. मात्र राज्यात भाजपशी मत्री करून सत्ता स्थापन करण्याचा शिवसेनेचा निर्णय झाल्यास ही व्होटबँक आपल्या भूमिकांबाबत पुनर्वचिार करण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली आणि खेड तालुक्यात मोठय़ा प्रमाणात अल्पसंख्याक व्होटबँक असून ती आतापर्यंतच्या निवडणुकीत नेहमी शिवसेनेच्या बाजूने कौल देत आल्याचे स्पष्ट झाले आहे. खेडमधील रामदास कदम आणि दापोलीचे सूर्यकांत दळवी पक्षाची अशी सर्वसमावेशक प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. यंदा मात्र त्यांच्या बाजूने ही अल्पसंख्याक व्होटबँक त्याच ताकदीने उभी राहणार काय? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
दुसऱ्या बाजूला युतीबाबत कोणताही निर्णय झाला तरी शिवसेनेला तगडे आव्हान देण्यासाठी भाजपचेच अस्त्र यशस्वी ठरणार असल्याचा विरोधकांचा अंदाज आहे. त्यामुळे युती झाल्यास किंवा फिस्कटल्यास दोन वेगवेगळ्या भूमिकांचे नियोजन काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गोटात सुरू आहे. युती फिस्कटल्यास एखाद्या बडय़ा नेत्याला भाजपमध्ये घेऊन निवडणूक लढवण्याच्या शक्यतेबाबत, तसेच युती झाल्यास अल्पसंख्याक व्होटबँकेसह भाजपच्या असंतुष्ट गटांशी चर्चा करण्याबाबत विरोधी पक्षांच्या वरिष्ठ स्तरीय चर्चा सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly elections 2014 shiv sena dapoli bjp
First published on: 25-09-2014 at 04:52 IST