राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद नसल्याच्या वादानंतर आता विधीमंडळात मराठी अभिमान गीतावरुन गदारोळ झाला. मराठी भाषा दिनानिमित्त विधीमंडळाच्या आवारात मराठी अभिमान गीताच्या समूहगायनावरुन विरोधकांनी सरकारची कोंडी केली. समूह गायनादरम्यान माईक बंद पडल्याने सरकारची नाचक्की झाली. तर या गीतातील एक कडवे समूहगायनादरम्यान वगळण्यात आले, असा आरोप विरोधी पक्षाच्या आमदारांनी केला. सरकारने मराठी भाषा आणि सुरेश भट यांचा अवमान केल्याचा आरोप करत आमदारांनी घोषणा दिल्या. शेवटी गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी भाषा दिनानिमित्त विधानभवन परिसरात मराठी अभिमान गीताचे समूहगायन करण्यात आले. संगीतकार कौशल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली या समूहगीताचे गायन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सर्वपक्षीय आमदार याप्रसंगी उपस्थित होते.

समूहगायन सुरु असताना माईक काही काळासाठी बंद पडला. विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी यावरुन सरकारवर टीका केली. या गाण्यातील एक कडवे वगळल्याचा आरोपही विरोधकांनी केला. ‘पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी..’ हे कडवं गाळल्याचा आरोप विरोधकांनी केला.

विधिमंडळात आज मराठी भाषा दिन साजरा करताना मराठी अभिमान गीताचे शेवटचे कडवे वगळण्यात आले. गीताचे गायन सुरु असताना अचानक माईक बंद झाला. हे कोणी मुद्दाम करत आहे का? याचे कंत्राट कोणाला दिले होते? यातून कोणाचा फायदा होत आहे?, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अजित पवारांनी केली.

राज्यातील काही मुलांना मराठी नीट वाचता येत नाही. सभागृहातील काही सदस्यांनाही मराठी नीट येत नाही. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शाळेत पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा केला पाहिजे. हा निर्णय अत्यंत आवश्यक आहे. हा निर्णय घेतला, तरच भाषा टिकेल, असेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assemblys budget session 2018 ncp ajit pawar slams bjp government marathi abhiman geet
First published on: 27-02-2018 at 11:33 IST