अलिबाग : निरुपणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्य सरकारने बुधवारी जाहीर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा येथे या पुरस्काराची घोषणा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मुलाच्या व्रतबंधन सोहळय़ासाठी रेवदंडा येथे आले होते. या सोहळय़ादरम्यान त्यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी नानासाहेब धर्माधिकारी यांना २००८ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता आप्पासाहेबांसाठी पुरस्काराची घोषणा होताच त्यांच्या अनुयायांनी रेवदंडा येथे फटाके फोडून जल्लोष केला. या पुरस्कारामुळे जाबाबदारी वाढली आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी अप्पासाहेबांनी दिली, तर हा दुग्धशर्करा योग असल्याचे सचिनदादा धर्माधिकारी म्हणाले.

आप्पासाहेबांचे सामाजिक कार्य

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजप्रबोधनाचे बाळकडू वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून मिळाले. समाजप्रबोधनाला मानवी उत्थानाची जोड देण्याचे काम त्यांनी केले. त्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्थापना केले. बाल संस्कारवर्ग, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, व्यसनमुक्ती, परिसर स्वच्छता, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन, विहिरी पुनर्भरण, शैक्षणिक साहित्य वाटप यासारखे उपक्रम त्यांनी हाती घेतली. त्यास श्री सदस्यांनी हातभार लावला. 

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य प्रेरणादायी आहे. गेली अनेक वर्षे व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मूलन, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता आदी क्षेत्रात त्यांचे काम अव्याहतपणे सुरु आहे. त्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, त्यामुळे या पुरस्काराची उंची आणखी वाढणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सन २००८ मध्ये वडील नानासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. आता तो मलाही जाहीर झाल्याचा आनंद आहेच. पण, पुरस्कारांबरोबर जबाबदारीही येत असते. त्यामुळे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सुरु असलेले सामाजिक कार्य व्यापक प्रमाणात पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील.

-आप्पासाहेब धर्माधिकारी, ज्येष्ठ निरुपणकार