Maharashtra 15000 Police Bharti: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आज महत्त्वाचा निर्णय घेत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील हजारो युवकांना दिलासा दिला आहे. पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो युवकांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारने दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस दलातील तब्बल १५ हजार पदे भरण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चार मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्र डीजीआयपीआर या एक्स हँडलवरून या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३,५६० पोलिसांची रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. त्यापूर्वी जून महिन्यात पोलीस महासंचालकांनी सुमारे १० हजार पोलिसांची भरती करण्याचे आणि १५ सप्टेंबरला मैदानी चाचणी होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी समन्वय समितीने काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. सप्टेंबरपूर्वी शासन निर्णय, अर्ज भरणे, अर्ज छाननी आणि परीक्षा घेणे अशक्य आहे, अशी मागणी विद्यार्थी समन्वय समितीने मागच्याच आठवड्यात केली होती.
मंत्रिमंडळाने घेतलेले चार महत्त्वाचे निर्णय
- महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे १५ जार पोलीस भरतीस मंजुरी
- राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण.
- सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय.
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ.
एकनाथ शिंदे, भरत गोगावलेंच्या अनुपस्थितीची चर्चा
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित असल्याची चर्चा आहे. जम्मू-काश्मीरचा दौरा आटोपून ते आजच्या बैठकीला हजर राहणार होते. मात्र त्यांचा मुक्काम लांबल्यामुळे ते अनुपस्थित राहिले. तसेच रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून असलेल्या नाराजीचेही पडसाद आजच्या बैठकीत दिसले. शिवसेनेचे (शिंदे) रायगडचे नेते मंत्री भरत गोगावले हेदेखील बैठकीला गैरहजर राहिल्याचे म्हटले जात आहे.