सोमवारी जिल्ह्यामध्ये ११ नव्या करोनाबाधित नोंद करण्यात आली. त्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या वाढून आता १९८ झाली आहे. उपचार घेत असलेल्या ९८ बाधितांपैकी १५ जण हे जिल्ह्याबाहेरील बाधित असून राज्य राखीव पोलीस दलाचे १० जवान व ५ जण अन्य राज्याचे रहिवाशी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही. नव्यानं सापडलेल्या करोना बाधितांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील १० जणांचा समावेश आहे. यामध्ये बापट नगर, वडगाव पोलीस चौकी जवळील खासगी रुग्णालयात कार्यरत ३२ वर्षीय महिला, उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर जिल्ह्यातील रहिवाशी असणारे चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलच्या कामावर असलेल्या तिघांचे चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहे. सध्या पागल बाबा नगर परिसरात कार्यरत असणाऱ्या तीन जणांचादेखील बाधितांमध्ये समावेश आहे. राज्य राखीव दलाच्या आणखी दोन जवानांचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत राज्य राखीव दलाचे  एकूण १० जवान चंद्रपूरमध्ये आल्यानंतर तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

नव्याने सापडलेल्या ११ बाधितांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याबाहेरील बाधिताची संख्या ६ आहे. यापूर्वी बाहेरून आलेल्या ९ जणांनाही करोनाची बाधा झाली होती.  त्यामुळे १९८ पैकी १५ बाधित अन्य जिल्ह्यांचे आणि राज्यांचे आहेत. जिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात १ हजार ९९ जणांना ठेवण्यात आलं आहे. ग्रामस्तरावर २२२, तालुकास्तरावर ४६२ आणि जिल्हास्तरावर ४१३ जणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. तर ८४ हजार ७८९ जणांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे.

राजुरा येथील कोविड केअर सेंटरची तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी पाहणी केली. तसेच गडचांदूर नगरपालिका परिसरातील केंद्राची मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळके यांनी पाहणी केली. पाहणी करताना कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्यविषयक सुविधांविषयीचा आढावा घेतला. बाधितांची कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना तहसीलदार यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra chandrapur coronavirus patient numbers increased to 198 out 100 people got discharge jud
First published on: 14-07-2020 at 08:12 IST