मुंबईः महाराष्ट्र सुश्रुषागृह नोंदणी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ३३४ खाजगी रुग्णालयांना टाळे ठोकून ती बंद करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरूवारी विधासभेत दिली. तर राज्यातील ३९१ बोगस डाॅक्टरांवर कारवाई करण्यात आली असून १७ डाॅक्टरांवर गुन्हे सिद्ध झाले असून दोघांना न्यायालायने शिक्षा दिल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
राज्यातील नोंदणीकृत खाजगी रुग्णालयांच्या तपासणी बाबत मनोज जामसुतकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान आबिटकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र सुश्रुषागृह नोंदणी कायद्यानुसार आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन होते काही नाही याची तपासणी करण्यासाठी राज्यात प्रथमच धडक मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यानुसार २३ हजार ३५४ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ४ हजार ८०७ रुग्णालयांना दर पत्रक न लावणे किंवा अन्य त्रुटींबद्दल एका महिन्यात सुधारणा करण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार १३६४ रुग्णालयांची पुन्हा पडताळणी करण्यात आली असून उर्वरित रुग्णालयांची तपासणी सुरू असल्याचे आबिटकर यांनी सांगितले. तसेच आता दरवर्षी अशी तपासणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील आरोग्य सेवांमध्ये कार्यरत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी हॉस्पिटलसोबतच निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने कालबद्ध आराखडा तयार आहे. हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि स्टाफसाठी नियमित उपस्थिती बंधनकारक करण्यात आली असून, बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सेवेसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. प्रत्येक गोष्टीची नोंदणी सक्तीने करण्यात येत असून, गैरप्रकार आढळल्यास चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.तर बोगस डाॅक्टर शोधमोहीमेच्या माध्यमातून ३९१ डाॅक्टरांवर कारवाई करण्यात आली असून १७ डाॅक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.