महाविकास आघाडी सरकारने आज(सोमवार) भोंग्याच्या संदर्भात आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीस खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनुपस्थित असणार आहेत. ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेत पार पडणार आहे. तसेच, या बैठकीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

मनेसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील या बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे मनसेकडून सकाळीच सांगण्यात आलं आहे. मनसेच्या वतीने या बैठकीला मनसेचे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित राहणार असल्याचंही मनसेनं स्पष्ट केलं आहे.

याशिवाय एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील या सर्वपक्षीय बैठकीस हजर राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी रमजान ईद म्हणजेच ३ मे पर्यंतचा अल्टीमेट ठाकरे सरकारला दिलाय. याच पार्श्वभूमीवर आता ही बैठक घेतली जात असून सरकारची भूमिका विरोधी पक्षांबरोबरच सत्ताधारी घटक पक्षांपर्यंत पोहचवण्याचा हेतू या बैठकीच्या माध्यमातून साध्य करण्याचा गृहमंत्रालयाचा प्रयत्न दिसत आहे.