मोदी सरकारला घाबरायचं की विरोधात लढायचं हे ठरवा, उद्धव ठाकरेंचं आवाहन

“आम्ही केलं तर पाप आणि तुम्ही केलं तर पुण्य,” उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर जोरदार टीका

केंद्र सरकारला घाबरायचं की त्यांच्याविरोधात लढायचं याचा निर्णय आपल्याला घ्यायचा असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आपण केलं की पाप आणि त्यांनी केलं की पुण्य असा टोला केंद्र सरकारच्या भूमिकेवरुन त्यांनी लगावला. तसंच जनतेचा आवाज कोणी दाबू शकत नाही, आणि जर तो दाबण्याचा प्रयत्न झाला तर तो अजून बुलंद करणं आपलं कर्तव्य आहे असंही यावेळी ते म्हणाले. या बैठकीत काँग्रेसचे चार आणि तर इतर पक्षांचे तीन मुख्यमंत्री सहभागी झाले.

“घाबरायचं आहे की लढायचं हे आधी आपल्याला ठरवलं पाहिजे. अन्यथा आपण रोज भेटत राहू आणि अशाच चर्चा करत राहू, जर आपल्याला लढायचं असेल तर मग ते कोणत्याही किंमतीत केलं पाहिजे,” असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलं.

“मोदी सरकारविरोधात एकत्र या,” सोनिया गांधींचं मुख्यमंत्री बैठकीत आवाहन; उद्धव ठाकरेही सहभागी

केंद्र सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, “ते विरोधी पक्षात आहेत किंवा ते इतर पक्षांबद्दल वाईट विचार करता असं नाही. पण तेदेखील सर्वसामान्यांचे प्रतिनिधी आहेत”. “आपलदेखील काही हक्क आहेत. आज सर्व सत्ता एका व्यक्तीच्या हातात आहे. पण मग राज्य सरकारांचा काय उपयोग? एकच व्यक्ती देश चालवणार अशी परिस्थिती निर्माण होणार आहे का ? हे होणार नाही. जर आपण राज्यघटनेला मानणार नसू तर मग लोकशाही कुठे आहे?,” असे सवाल उद्धव ठाकरेंनी विचारले.

“आपल्याकडे तसं काही झालं तर…”; शाळांसंदर्भात अमेरिकेचा दाखला देत उद्धव यांनी व्यक्त केली चिंता

उद्धव ठाकरे यांनी बैठकीत बोलताना म्हटलं की, “अमेरिकेत शाळा सुरु केल्यानंतर ९७ हजार मुलांना करोनाची लागण झाल्याचे रिपोर्ट आहेत. जर आपल्याकडे अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करणार आहोत?”. राज्यातील लॉकडाउन शिथील केला जात असतानाही शाळा मात्र बंद ठेवण्यात आल्या आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं. “करोना संकट लवकर टळावं आणि समोरासमोर बसून आपण चर्चा करावी अशी अपेक्षा आहे. जे काही करु ते एकत्र मिळून करु,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंनी यावेळी पुन्हा लॉकडाउनमध्ये जाण्याची इच्छा नसल्याने धीम्या गतीने निर्बंध शिथील करत असल्याचं सांगितलं. “आपण केंद्र सरकारकडे एक योग्य प्रोगाम घेऊन केलं पाहिजे, आपण केंद्र सरकारकडे भीक नाही तर आपले हक्क मागत आहोत. पंतप्रधान आणि राज्य सरकार निवडणारी लोक सारखीच आहेत. पण आपण केलं की पाप आणि त्यांनी केलं की पुण्य. जनतेचा आवाज कोणी दाबू शकत नाही, आणि जर तो दाबण्याचा प्रयत्न झाला तर तो अजून बुलंद करणं आपलं कर्तव्य आहे,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra cm uddhav thackeray targets centre government during meeting congress sonia gandhi sgy

ताज्या बातम्या