नाशिक : राज्यातील नगर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे. विदर्भ, मराठवाडय़ात फारसे रुग्ण नाहीत. सध्या  राज्यातील संसर्ग दर दोन टक्क्यांपेक्षा कमी असून ही दिलासादायक बाब असल्याचे आरोग्य विभागाच्या  संचालक  डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.

राज्यात सध्या करोनाचे २९ हजार सक्रिय रुग्ण आहेत. लसीकरणाचा चांगला परिणाम दिसत आहे. आतापर्यंत जवळपास ६८ टक्के नागरिकांना पहिली मात्रा तर ३२ टक्के व्यक्तींना दोन्ही मात्रा दिल्या गेल्या आहेत. मुंबई, पुणे, भंडारा, रायगड अशा काही जिल्ह्यात ९० टक्क्यांहून अधिक लसीकरण झाले आहे. देशात तिसऱ्या बुस्टर मात्रेपर्यंत जाण्याची गरज भासणार नाही. सध्या विहित वयोगटात सर्वाना दोन मात्रा देण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. दुसरीकडे संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन तयारी केली जात आहे. या लाटेत दुसऱ्या लाटेच्या दीडपट बाधित होतील, असा अंदाज केंद्राकडून देण्यात आला. ते लक्षात घेऊन प्राणवायू, औषधे आदींची तयारी करण्यात आली. प्राणवायू व्यवस्थापनाबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. काही महापालिका क्षेत्रात डेंग्यू व चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढल्याचे डॉ. पाटील यांनी मान्य केले.