राज्यात बुधवारी महाराष्ट्र दिनाचा उत्साह असून विविध राजकीय नेत्यांनीही राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बुधवारी १ मे रोजी राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात असून सकाळी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही ट्विटरवरुन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्र दिनानिमित्त ट्विट केले असून यात मोदी म्हणतात, महाराष्ट्र ही क्रांतिकारक आणि समाजसुधारकांची भूमी आहे. महाराष्ट्रामुळे भारताच्या विकासाच्या प्रक्रियेला चालना मिळाली. भविष्यातही राज्याची अशीच प्रगती होत रहावी अशी प्रार्थना करतो, असे मोदींनी म्हटले आहे.

राज ठाकरेंनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

शरद पवारांनीही ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या. शरद पवार म्हणतात, आपल्या महाराष्ट्र राज्यावर सध्या दुष्काळाचं सावट आहे, बळीराजा हवालदिल आहे, तरूणांना रोजगार नाही, कष्टकऱ्यांच्या हातांना काम नाही. या सर्व संकटांवर मात करून आपल्या समृद्ध, संपन्न राज्याची विकासाची परंपरा अखंडीत ठेवण्याचं आव्हान आपल्यापुढे आहे. यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग हवा. आपल्या बलशाली, पुरोगामी राज्याची गौरवशाली परंपरा उद्धृत करून राज्याची सर्वांगीण प्रगती आणि विकास साध्य करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

केंद्रीय मंत्री मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू यांनी देखील ट्विटरद्वारे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.