कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याने महाराष्ट्र दिनाचे (१ मे) औचित्य साधून पहिल्या टप्प्यात दहा गाडया विजेवर चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वे महामंडळाने घेतला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मांडवी एक्स्प्रेस, जनशताब्दी, कोकणकन्या, मत्स्यगंधा, नेत्रावती, मंगला एक्स्प्रेस इत्यादी प्रमुख गाडय़ांचा यामध्ये समावेश आहे. 

 रोहा ते ठोकूर या सुमारे ७०० किलोमीटर लांबीच्या कोकण रेल्वेचा मार्गावर विद्युतीकरणाचे काम २०१५ मध्ये हाती घेण्यात आले. सहा टप्प्यातील योजनेसाठी सुमारे १ हजार १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. रोहा ते रत्नागिरी, रत्नागिरी ते थिविम, थिविम ते वेरणा, वेरणा ते कारवार, कारवार ते बिजूर, बिजूर ते ठोकूर या सहा टप्प्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गेल्या मार्च महिन्यात या कामाची तपासणी केली. त्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर प्रथम मालगाडय़ा आणि नंतर प्रवासी गाडय़ा या मार्गावर सोडण्यात आल्या. त्याही चाचण्या यशस्वी झाल्यामुळे आता या मार्गावर दहा प्रमुख गाडय़ा नियमितपणे विजेवर धावू लागणार आहेत.       

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी विद्युतीकरण नसल्यामुळे एखाद्या पट्टयात लांब पल्ल्याच्या गाडय़ा धावताना समस्या येत होती. मध्य रेल्वेच्या रोहा स्थानकापर्यंत विद्युतीकरण असल्याने विजेवरील लोको मेल, एक्स्प्रेस गाडयांना जोडल्या जात होत्या. त्यापुढे विद्युतीकरण नसल्याने डिझेलवरील लोको जोडून मेल, एक्स्प्रेस चालवण्याशिवाय पर्याय नव्हता. ही समस्या आता दूर झाली आहे. पहिल्या टप्प्यात रोहा ते रत्नागिरीचे काम पूर्ण झाले होते. या मार्गावर प्रथम विजेचे इंजिन लावून गाडी चालवण्यात आली. त्यात कोणत्याही अडचणी आल्या नव्हत्या. त्यानंतर पुढील टप्प्यात रत्नागिरी ते मडगावचे काम पूर्ण करण्यात आले. रेल्वे सुरक्षा पथकाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर सर्व गाडय़ा सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. विजेचे इंजिन जोडून मंगळूरु सेंटर ते मडगाव पॅसेंजर, तिरुवंनतपुरम ते निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस, मडगाव ते निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेससह मंगला एक्स्प्रेस, मांडवी, जनशताब्दी, कोकणकन्या, मत्स्यगंधा, नेत्रावती एक्स्प्रेस याही गाडया विजेवर चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे वेळेची बचत आणि प्रदूषणाला आळा बसणार आहे.