काँग्रेस आघाडीने तीन जागा गमावल्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजय पाटील, कराड</strong>

राज्यात भाजप-शिवसेना महायुतीची पडझड झाली असली,तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या सातारा जिल्ह्यात मात्र, भाजपने खाते उघडताना दोन जागांची कमाई केली. तर, शिवसेनेने पाटणचा गड अभेद्य राखताना कोरेगावमधून राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांचा पराभव करीत महेश शिंदेंच्या माध्यमातून आणखी एका मतदारसंघावर सेनेचा भगवा फडकवला आहे. जिल्ह्यात काँग्रेसची खटाव-माण तसेच राष्ट्रवादीची सातारा व कोरेगावची जागा महायुतीकडे गेल्याने काँग्रेस आघाडीला जबर धक्का बसला आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे आणि चव्हाणांच्या पराभवासाठी भाजपने सत्तेची ताकद लावल्याने कराड दक्षिणची लढत सर्वदूर चर्चेत राहिली होती. परंतु, अपवाद वगळता सतत मताधिक्क्यांमध्ये वाढ होत जवळपास सव्वानऊ हजारांच्या मताधिक्क्याने पृथ्वीराज चव्हाण या मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांना कृष्णाकाठावर काहीसे बहुमत मिळाले. परंतु, पृथ्वीराजांचे मताधिक्य घटवणाऱ्या डॉ. भोसलेंना विजयासमीपही जाता आले नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ व बंडखोर नेते विलासकाका उंडाळकरांचे पुत्र, अपक्ष उमेदवार अ‍ॅड. उदयसिंह पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

कोरेगाव मतदारसंघात विद्यमान आमदार शशिकांत शिंदे या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला हार पत्करावी लागली. भाजपतून शिवसेनेत जात धनुष्यबाणाच्या चिन्हावरील उमेदवार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे विधानसभेतील पक्षप्रतोद व माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. शशिकांत शिंदे हे या निवडणुकीतील पराभूत होणारे जिल्ह्यातील एकमेव विद्यमान आमदार आहेत.

सातारा विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे शिवेंद्रराजे भोसले मोठय़ा मताधिक्याने जिंकले. परंतु, त्यांच्यात भाजप पक्षातून लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार उदयनराजे भोसले हे मोठय़ा फरकाने राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभूत झाल्याने शिवेंद्रराजेंच्या विजयाला उदयनराजेंच्या पराभवाच्या नाराजीची झालर राहिली.

शिवेंद्रराजेंना भाजपची उमेदवारी मिळताच भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल होत घडाळय़ाच्या चिन्हावर दीपक साहेबराव पवार यांचा मोठय़ा फरकाने पराभव झाला. आता शिवेंद्रराजेंना मंत्रीपद मिळते का याकडे सातारकरांच्या नजरा लागून राहणार आहेत.

कराड उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळसाहेब पाटील यांनी पाचव्यांदा विजय संपादन केला. त्यांचे मताधिक्क्य ४८ हजारावर असून, भाजपचे बंडखोर उमेदवार मनोज घोरपडे हे त्यांचे प्रतिस्पर्धी राहिले आहेत. काँग्रेसमधून शिवसेनेत जाऊन धनुष्यबाणाच्या चिन्हावरील धर्यशील कदम तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

विलक्षण घडामोडी राहिलेल्या माण-खटाव मतदारसंघातून जयकुमार गोरे हेच निवडून आले. परंतु, पक्षांतरामुळे त्यांचे चिन्ह ‘हात’ऐवजी कमळ राहिले होते. स्थानिक नेत्यांचे  ‘आमचं ठरलयं’चे माध्यम फोल ठरले.

मात्र, आमचं ठरलयंचे अपक्ष उमेदवार, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख दुसऱ्या स्थानावर राहिले. या मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत राहिली होती. जयकुमारांचे बंधू शेखर गोरे शिवसेनेतून नशीब आजमावत असताना या खेपेस त्यांना तुलनेत अगदीच कमी मते मिळाली.

वाई मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील यांनी हॅट्रीक साधली. काँग्रेसमधून भाजपमध्ये जात कमळाच्या चिन्हावरील उमेदवार व काँग्रेसचे माजी आमदार मदन भोसले यांचा मकरंद पाटील यांनी दारूण पराभव केला. फलटण मतदारसंघातूनही राष्ट्रवादीचेच विद्यमान आमदार दीपक चव्हाण हे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसमधून भाजपत जाऊन कमळाच्या चिन्हावरील उमेदवार दिगंबर आगवणे यांचा मोठय़ा फरकाने पराभव केला.

पाटण विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे शंभूराज देसाई यांनी सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांचा शंभूराज यांनी दारूण पराभव केला.

शंभूराज हे गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात सर्वाधिक निधी आपल्या पाटण मतदारसंघात आणणारे विधानसभेतील संसदपटू असा बहुमान मिळवणारे तडफदार आमदार असल्याने आतातरी शिवसेनेकडून त्यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा पाटणच्या जनतेला राहिली

आहे.

सातारा जिल्ह्यात प्रबळ उमेदवारांनी प्रचंड ताकदीने विधानसभेचे रणांगण गाजवले असले,तरी कोरेगावचा अपवाद वगळता इतर आठही जागांवर विद्यमान विधानसभा सदस्यच जिंकले आहेत. मात्र, पक्षांतरमुळे भाजपला दोन तर शिवसेनेला एका जागेचा फायदा होताना काँग्रेसने एक व राष्ट्रवादीने दोन आमदारांचे संख्याबळ गमावले आहे. विजयी उमेदवारांच्या समर्थक कार्यकत्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजीही केली. झेंडे नाचवत जयघोषात दुचाकींच्या रॅलीही अनेक ठिकाणी निघाल्या होत्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra election result 2019 zws bjp two seats increased in satara and one shiv sena zws
First published on: 25-10-2019 at 04:12 IST