गडचिरोली जिल्ह्यातील कोपर्सीच्या जंगलात बुधवारी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलातील तीन जवान जखमी झाले असून जखमी पोलिसांना रायपूरमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींमध्ये जिल्हा पोलीस दलातील दोन तर सीआरपीएफच्या एका जवानाचा समावेश आहे. चकमकीनंतर पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.
भामरागड तालुक्यातील कोपर्सीच्या जंगलात नक्षलवाद्यांविरोधात पोलिसांचे अभियान सुरु आहे. बुधवारी कोपर्शी आणि पुलनार जंगलात अभियान सुरु असताना नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य केले. मात्र सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. बराच वेळ दोन्ही बाजूंनी चकमक सुरु होती. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर नक्षलवाद्यांनी तिथून पळ काढला. या चकमकीदरम्यान सीआरपीएफचे जवान टी. गुनिया आणि जिल्हा पोलीस दलातील गिरधार तुलावी आणि विजयसिंह ठाकूर जखमी झाले. या जवानांना हेलिकॉप्टरने रायपूरमधील रुग्णालयात हलवण्यात आले.
तलवारगड जंगल परिसरातही ग्यारापत्ती पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांचे संयुक्त अभियान सुरु होते. तिथेही नक्षलवादी आणि सुरक्षादलांमध्ये चकमक झाली. सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरामुळे नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरुन जंगलात पळ काढला. घटनास्थळावरुन पोलिसांनी तीन रायफल. ३० नग लोखंडी छर्रे, नक्षली साहित्य जप्त केले आहे. मंगळवारीदेखील मौजा हालदंडी जंगलात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन सुमारे २ किलोंचे विस्फोटक पदार्थ जप्त केले होते. लागोपाठ दोन दिवस चकमक झाल्यानंतर गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागातील अभियान आणखी तीव्र करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नक्षलवाद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या भागात अजूनही शोधमोहीम सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, कोपर्सीच्या जंगलातील जवानांच्या मदतीसाठी निघालेल्या सुरक्षा दलाच्या पथकालाही नक्षलवाद्यांनी लक्ष्य केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. भूसुरुंग स्फोटात १२ जवान जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.