शेतकरी संपामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले पुणतांबे हे गाव पूर्वीपासून आध्यात्मिक, धार्मिक व पौराणिकदृष्टय़ा महत्त्वाचे आहे. चांगदेव महाराजांची समाधी येथेच असून, येथे गोदावरी उत्तरवाहिनी होत असल्याने सुख-दु:खाचे दोन्ही विधी येथे केले जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव असलेले हे गाव आधीपासूनच चळवळींचे केंद्र मानले जाते.
गोदावरी नदीच्या काठी वसलेले व मराठवाडय़ाच्या सरहद्दीवर असलेले पुणतांबे हे गाव पूर्वीपासून धार्मिकदृष्टय़ा महत्त्वाचे मानले गेले आहे. चांगदेव महाराजांची ही तपोभूमी. येथेच त्यांनी समाधी घेतली. त्यांचे वशंज येथे अजूनही राहतात. काíतकस्वामी, अन्नपूर्णादेवी, मामाभाचे मंदिर, शनी व कालभैरव मंदिर अशी थोडीथोडकी नाही तर पुरातन ४५० मंदिरे गावात आहेत. गोदावरी येथे उत्तरवाहिनी होत असल्याने श्राद्धाचे, पिंडाचे विधी येथे होत. त्र्यंबकेश्वरला होणारे नारायण नागबळी, कालसर्पशांती असे अनेक विधी याच गावात केले जात होते. धार्मिक विधी करणारे अनेक गुरू मराठवाडा व शेजारच्या जिल्ह्यात जात असत. ब्राह्मण समाजाची येथे पूर्वी संख्या मोठी होती. गावातील दोन हजार एकर जमिनीचे ते मालक होते. आजही काहींनी जमीन विकली असली तरी त्यांच्याकडे एक हजार एकरापेक्षा अधिक शेती आहे. जहागिरदार, जोशी, नाईक, कुलकर्णी, लुंपाटकी, गोर्हे, सराळकर, बिडवाई, देहाडराय, खुळगे, रत्नपारखी, मुळे, रोकडे, चितळकर, पुणतांबेकर अशा आडनावांचे ब्राह्मण समाजातील लोक असून, आता ते उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने जगभर स्थिरावले आहेत. आता शेती महामंडळाच्या जमिनी पुन्हा त्यांच्या वारसांना वाटप झाल्याने त्यांचा गावाशी संबंध जोडला आहे. ज्येष्ठ संगीतकार सी. रामचंद्र हे येथीलच. त्यांचे नातेवाईक येथेच राहून शेती करतात.
स्वातंत्र्य चळवळीत गावातील अनेकांनी भाग घेतला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रामराव बोर्डे हे येथेच राहायचे. स्वातंत्र्यापूर्वी या गावात १९४० मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा येथे सुरू झाली. वहाडणे, जोशी, देहाडराय यांनी ती सुरू केली. आजही दररोज शाखा भरते अन् शाखेवर नियमित १५० ते २०० स्वयंसेवकांची उपस्थिती असते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या गावाला भेटी दिल्या आहेत. आजही संघ वर्तुळात गावाकडे आदराने पाहिले जाते. जिल्ह्यातील शिवसेनेची पहिली शाखा येथे सुहास वहाडणे यांनी सुरू केली. ते काही काळ जिल्हाप्रमुखही होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष एवढेच पक्ष येथे आहेत. कम्युनिस्ट किंवा शेतकरी संघटना येथे नाही. माजी खासदार दिवंगत सूर्यभान वहाडणे यांचे हे गाव. वहाडणे यांनी खंडकरी शेतकऱ्यांची चळवळ उभी केली. सुरुवातीला त्यांच्यावर टीका होत असे. पण जनसंघाचे काम ध्येयवादातून त्यांनी पुढे सुरू ठेवले. सचोटी, ध्येयवाद, निष्ठा असलेले कडवे हिंदुत्ववादी कार्यकत्रे आजही या गावात आहेत. वहाडणे यांच्याप्रमाणेच सुरुवातीच्या काळात स्व. जगन्नाथ बारहाते, बाबुराव चतुर्भुज हे दोन माजी आमदार या गावातीलच होते. दिवंगत भास्करराव जाधव, कामगार नेते सुभाष कुलकर्णी, पूर्वीचे शिक्षक नेते चंद्रकांत धनवटे हे देखील पुणतांब्याचे. राज्यपातळीवर विविध क्षेत्रात गावातील अनेक दिग्गजांनी नेतृत्व केले.
दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर पूर्वी कोळशाची इंजिने चालत. तेव्हा येथे इंजिनाला पाणी भरण्याची सोय होती. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची मोठी वसाहत येथे होती. २००८ साली शिर्डी रेल्वेमार्ग झाल्यानंतर येथे रेल्वेचे जंक्शन झाले. राज्यातील पहिली शेतीशाळा येथेच सुरू झाली. येथून शिकून पंचायत राजमध्ये ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व कृषी अधिकारी म्हणून अनेक जण आजही काम करतात. चांगदेव साखर कारखाना, शेती महामंडळामुळे मराठवाडा व विदर्भातून येथे रोजगारासाठी अनेक जण आले. गोदावरीला पाणी होते तोपर्यंत येथील शेती फुललेली होती. मात्र आता ती जिरायतच बनली. वाळू तस्करांनी नदीत वाळूच ठेवली नाही. त्यामुळे विहिरींचे पुनर्भरण थांबले. गावात साडेचार हजार एकर जमिनीचा शिवार असून, गेल्या १० वर्षांत एक हजार एकर जमीन येथे विकली गेली. साईबाबांची शिर्डी १४ किलोमीटर, श्रीरामपूर १८ किलोमीटर तर कोपरगाव २४ किलोमीटरवर असल्याने मुंबई, दिल्लीसह आंध्रातील श्रीमंत साईभक्तांनी गुंतवणूक म्हणून येथे मोठय़ा प्रमाणात जमिनी घेऊन ठेवल्या. शेतजमीन ही आता शेतकऱ्यांच्या हातून चालली आहे. पूर्वी हे गाव बाजारपेठेचे होते तसेच ते वाडय़ांचे होते. पेशवेकालीन वाडे सर्वाधिक असलेले जिल्ह्यातील हे गाव. पण आता वाडय़ांची पडझड झाली. काहींनी वाडे विकून पसे कमविले. वाडय़ात धन सापडते अशा चर्चा पूर्वी असायच्या. त्यामुळे जुने वाडे घ्यायला लोक येथे येत. आजही २५ टक्के वाडे टिकून आहेत. या गावाला आजही सर्व बाजूंनी तटबंदी आहे.
ख्रिश्चन समाज येथे मोठय़ा संख्येने राहतो. मेथॉडिस्ट चर्च येथे फार पूर्वीच स्थापन झाले. त्यांची स्वतची शिक्षण संस्था आहे. येथे मिशनरी लोकांनी चर्चची जशी स्थापना केली तसेच आशा केंद्राच्या माध्यमातून येथे सामाजिक उपक्रम चालत. आता या केंद्रात अर्धागवायूवर आयुर्वेदिक उपचार केले जातात. राज्यभरातून रुग्ण येथे येतात. राजकीय नेते, अभिनेते, दिग्गजांनी येथे अर्धागवायूवर उपचार घेतले आहेत. गेल्या काही वर्षांपासून अर्धागवायूचे पुणतांबे अशी गावाची नव्याने ओळख झाली आहे. संस्कार, सेवाभाव व ध्येयवादी लोक गावात राहत असले तरी पूर्वीपासून हे गाव संवेदनाक्षम आहे. १९८६ मध्ये या गावात िहदू व ख्रिश्चन समाजात दंगल झाली. मूर्तीची विटंबना झाल्यामुळे दंगल उसळली होती. जाळपोळ झाली. सुमारे १५० लोकांवर गुन्हे नोंदविण्यात आले. पण पुढे ते सारे निर्दोष सुटले. २००२ मध्ये पुणतांबे पोलीस दूरक्षेत्रावर आदिवासींनी मोर्चा नेला. पोलिसांना जाळण्याचा प्रयत्न झाला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इंदुबाई माचरे व प्रदीप दुिशग या दोघांचा मृत्यू झाला. तेव्हा राज्यातील सर्व दलित संघटनांनी निषेध करून सरकारला धारेवर धरले होते. अशाप्रकारे राजकीय व सामाजिकदृष्टय़ा हे गाव अतिशय संवेदनाक्षम मानले जाते.
हे गाव कोपरगाव लोकसभा मतदारसंघात येते. त्यामुळे माजी मंत्री शंकरराव कोल्हे व माजी मंत्री स्व. शंकरराव काळे यांचे जसे समर्थक आहेत तसेच काँगेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचेही समर्थक आहेत. त्यांचे समर्थक व एक गट असतो. असे असले तरी येथील काही कार्यकत्रे हे स्वतच्या मर्जीप्रमाणे निर्णय घेतात. वेळप्रसंगी ते नेत्यांना वाकवितात. स्वतंत्र भूमिका घेणारे कार्यकत्रे येथे आहेत.
गेली तीन वर्षे सलग दुष्काळ, नंतर अतिवृष्टी, शेतमालाचे कोसळलेले भाव यामुळे येथील अर्थकारणच कोलमडले होते. गावाच्या अर्थकारणाला, बाजारपेठेला अवकळा आली असून, त्यातूनच संपाच्या बिजाचे रोपण झाले. त्याला प्रतिसादही मिळाला. संपाच्या केंद्रस्थानी आल्यानंतर ते प्रकाशझोतात आले.
- गावात सुमारे साडेचार हजार एकर जमीन असून, सोळा हजार लोकसंख्या आहे. अकरा हजार मतदार आहेत. मुस्लीम समाज संख्येने फारच अल्प आहे.
- गावात एकूण साडेचार हजार कर्जदार शेतकरी आहेत. सहा सेवा संस्था असून, शेतकऱ्यांकडे सुमारे ३ कोटींचे कर्ज थकित आहे. ऊस, फळबागा नसल्याने शेतकऱ्यांचे कर्जाचे प्रमाण कमी आहे.
- गेली तीन वर्षे सलग दुष्काळ, नंतर अतिवृष्टी, शेतमालाचे कोसळलेले भाव यामुळे येथील अर्थकारणच कोलमडले होते.
- साखर कारखान्याला ऊस नसल्याने तो पूर्वीच १९८४ मध्ये विकण्यात आला. यंत्रसामग्री बाहेर हलविण्यात आली.
- दूधही अडीच हजार लिटरच्यावर नाही. एकूणच बागायती असलेला हा भाग जिरायत झाल्यानंतर त्याची वाताहत झाली. त्यामुळे आता मजुरांसह शेतकरी व अन्य घटकांनीही गाव सोडले असून स्थलांतर केले आहे.
- गावच्या अर्थकारणाला, बाजारपेठेला अवकळा आली असून, त्यातूनच संपाच्या बीजाचे रोपण झाले.