कराड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षक पट्ट्यात (बफर झोन) येणाऱ्या पाटण तालुक्यातील कसणीसह निनाईचीवाडी, सतीचीवाडी, मस्करवाडी, धनगरवाडा, बौद्धवस्ती या पाच वाड्यांच्या पुनर्वसनास अखेर मान्यता मिळाली आहे. पुनर्वसनाच्या या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांच्या दोन दशकांपासूनच्या लढ्याला यश आले असून, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रयत्नही फलश्रुतीस गेले आहेत.

कसणीचे सरपंच महेंद्र गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षक पट्ट्यातील समावेशानंतर वन्य प्राण्यांमुळे कसणी परिसरातील पाच वाड्या-वस्त्यांवर शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळेच कसणीखालील पाच वाड्यांचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी दोन दशके शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रश्नी लक्ष घातले आणि त्यांच्या पाठपुराव्यास यश आले असून, पुनर्वसनास शासनाने मान्यता दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये समाविष्ट निनाईचीवाडी, सतीचीवाडी, मस्करवाडी, धनगरवाडा, बौद्धवस्ती या वाड्यावस्त्यांमधील ग्रामस्थ, शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा उपद्रव सतत वाढत होता. या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेळ्या, गाई, वासरे, म्हैस असे प्राणी ठार होण्याचे प्रकार सतत वाढत होते. त्याचबरोबर गवे, डुक्कर, वानर, मोर व अन्य वन्य प्राण्यांकडून शेतीतील उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान होत होते. वारंवार होणाऱ्या हानीमुळे स्थानिकांना जीवनच नकोसे झाले होते. तर, धनगरवाडा संरक्षित क्षेत्रापासून (कोअर झोन) शून्य मीटरवर असूनही संरक्षक पट्ट्यामध्ये समावेश केल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पुनर्वसनाची मागणी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर मंत्री देसाई यांनी पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी मंत्रालयाकडे पाठविला होता. प्रस्तावाला तब्बल पाच वर्षांनंतर देसाई यांनी पाठपुरावा केल्यामुळे अखेर मंजुरी मिळाली. यासाठी मंत्रालयातील बैठकीला वनमंत्री गणेश नाईक, मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह संबंधित खात्यांच्या उच्चपदस्थांची उपस्थिती होती.