अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेणाऱ्या नागरीक अथवा संस्थांना राज्य शासनाच्या गृह खात्यातर्फे दीड लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. पोलिसांकडून तसा प्रस्ताव आल्यानंतर राज्यस्तरीय समिती त्यातून तिघांची निवड करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात दरवर्षी मोठय़ा प्रमाणात वाहन अपघात होतात. त्यामध्ये साधारणपणे दरवर्षी तेरा हजार लोकांचा मृत्यू होतो.
सरासरी ४५ हजार लोक जखमी होतात. अपघातातील जखमींना वैद्यकीय व इतर मदत तातडीने न मिळाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात व त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त होतात. त्यामुळे अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या तसेच जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या नागरीक वा संस्थांना बक्षीस देऊन गौरव करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. गृहमंत्र्यांच्या रेसकोर्स निधीतून हे बक्षीस देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली.
पहिले बक्षीस दीड लाख रुपये, दुसरे बक्षीस एक लाख रुपये व तिसरे बक्षीस ५० हजार रुपये दिले जाणार आहे. वाहन, रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या, जखमींचे प्राण वाचविण्यासाठी त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या व्यक्ती/संस्था/समूह यांना हे बक्षीस दिले जाणार आहे. अपघात घडल्यापासून महिन्याच्या कालावधीत अपघातग्रस्तांना केलेल्या मदतीसंदर्भात पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच शहर पोलीस आयुक्तालयातील वाहतूक शाखेचे प्रमुख बक्षीस देण्याचा प्रस्ताव शासनास सादर करतील. त्यानंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. शासनस्तरावर जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर त्यापुढील वर्षांच्या मार्च अखेपर्यंत निर्णय घेण्यात येईल.
शासनाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधून व्यक्ती/संस्था/समूह यांची बक्षिसाठी निवड करून शिफारस करण्यासाठी गृह खात्याच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आहे. गृह खात्याचे प्रधान अथवा विशेष सचिव, राज्य पोलीस दलातील वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक, सह अथवा उपसचिव (विशा-९) हे सदस्य, तर सह अथवा उपसचिव (पोल-८) हे सदस्य सचिव राहतील, असे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government to reward those who help road accident victims
First published on: 26-02-2014 at 12:31 IST