Ujjwal Nikam: “माझी सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी, यासाठी मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते, हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले की, सदर खटला चालविण्यासाठी मी तयार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने तसे आदेश दिले आहेत. मस्साजोगच्या रहिवाशांनी उपोषण सोडावे, असे मी आवाहन करतो. या देशात कायदा आणि न्याय सर्वोच्च आहे. प्रकृतीला त्रास होईल, असे कोणतेही कृत्य कुणीही करू नये. या खटल्यात पोलिसांनी आरोपपत्र दाखल करताच आम्ही तातडीने हा खटला चालिवण्यास घेऊ”, अशी प्रतिक्रिया वकील उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिले.

“माझ्या नियुक्तीनंतर राजकीय पडसाद उमटतील, याची मला आधीच कल्पना होती. मुख्यमंत्र्यांनाही हे मी सांगितले होते. यापूर्वीही विरोधी पक्षाचे अनेक वकील राजकारणात होते आणि आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला सांगितले. मी राजकारणात कधीही सक्रिय नव्हतो. राजकारणात आता आलो असलो तरी माझ्या कर्तव्यात कधीही, कुणीही आडवे येऊ शकत नाही. त्यामुळे मी त्याच जोमाने या प्रकरणात लक्ष घालेल”, असेही वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले.

उज्ज्वल निकम पुढे म्हणाले, “विरोधकांचे काहीही आरोप असले तरी मी त्याला महत्त्व देत नाही. कारण विरोधासाठी विरोध करणे, हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे.”

मस्साजोग ग्रामस्थानी अन्नत्याग आंदोलन सुरू केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वकील उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली. “बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संतोष देशमुख हत्या प्रकरण नेमके काय आहे?

बीड जिह्यातील केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग गावात पवनऊर्जा प्रकल्प राबविणाऱ्या आवादा कंपनीकडून खंडणी उकळण्याच्या प्रयत्नातून गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृणपणे हत्य करण्यात आली होती. यानंतर बीडसह राज्यभरात आंदोलन सुरू झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने सात आरोपींना ताब्यात घेतले. तसेच घटनेच्या तब्बल २० दिवसांनी संशयित आरोपी वाल्मिक कराडने पुण्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आठ आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हत्येमधील कृष्णा आंधळे नामक आरोपी अद्यापही फरार आहे.