पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा जम्मू काश्मीरातील कलम ३७० चा पुर्नउच्चार केला. मोदींनी कलम ३७० वरून काँग्रेससह विरोधकांवर हल्लाबोल केला. मोदी म्हणाले, “भाजपाने जेव्हा जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवलं, तेव्हा काँग्रेससह सर्वांनी विरोध केला. ही लोकशाहीची हत्या असल्याची भाषा वापरली. विरोधकांच्या या कर्माच्या शिक्षा देश त्यांना देईल. पण पहिली संधी महाराष्ट्राला मिळाली असून, ती सोडू नका,” असं आवाहन मोदी यांनी केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. गुरूवारी मोदी यांची राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळीत सभा झाली. यावेळी मोदी यांनी विरोधकांवर कलम ३७०वरून निशाना साधला. मोदी म्हणाले, “केंद्र सरकारने कलम ३७० हटवून जम्मू काश्मीरमधील वंचितांना, अल्पसंख्याकांना अधिकार मिळवून दिले. मात्र इथेही विरोधकांचा स्वार्थ जागा झाला. आम्ही राजकारणासाठी करत नाही. तर देशासाठी करतोय. विरोधक म्हणत आहेत की लोकशाही संपली आहे, मला तुम्ही सांगा लोकशाही संपली आहे का?,” असा सवाल मोदी यांनी उपस्थितांना केला.

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर विरोधकांची भाषा कशी होती, याची यादीच माझ्याकडं आहे. एक नेता म्हणाला, “कलम ३७० हटवणं म्हणजे हत्या करण्यासारखंच आहे. आणखी एक नेता म्हणाला, हा काळा दिवस आहे. तर एक मोठा नेता म्हणाला लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. काँग्रेसचा एक नेता म्हणाला, ३७० हटवून काश्मीर गमावलं आहे. ही आपल्या विरोधकांची भाषा आहे. तुम्ही मला सांगा आपण काश्मीर गमावलं आहे का? तुम्हाला काश्मीरला जायचं असेल तर मला सांगा, मी व्यवस्था करतो,” असं सांगत मोदी म्हणाले, “विरोधक म्हणतात, “जर काश्मीरमध्ये हिंदू असते, तर भाजपाने असा निर्णय कधीच घेतला नसता. यावरूनही विरोधक हिंदू मुस्लिम राजकारण करत आहे. या लोकांना निवडून निवडून शिक्षा देणार की नाही. माझ्याकडे काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यांची यादीच आहे. ते सांगत बसलो तर २१ ऑक्टोबरपर्यंत थांबाव लागेल. त्यामुळे देश विरोधकांना त्यांच्या कर्माची शिक्षा देईल. पण, पहिली संधी महाराष्ट्राला आहे. तुम्ही संधी सोडू नका. माझा तुमच्यावर तुमच्या देशभक्तीवर विश्वास आहे,” असं मोदी म्हणाले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra have first chance to punish opposition modi says in parli bmh
First published on: 17-10-2019 at 13:09 IST