आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ सुरूच आहे. आज मुंबई, पुणे, नाशिक येथील आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. अनेक विद्यार्थ्यांना पेपर मिळण्यास उशीर झाल्याचं समोर आलंय. तसेच मुलांच्या आसनव्यवस्थेही घोळ झाला आहे. पुण्यात एका केंद्रावर परीक्षेची वेळ होऊनही विद्यार्थांना आसन क्रमांक न मिळाल्याचा आरोप करत विद्यार्थांनी गोंधळ घातला आहे. परीक्षा केंद्रांवर सर्व अधिकारी उडवा-उडवीची उत्तर देत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. नाशिकमध्ये निम्म्या विद्यार्थांना पेपरच मिळालेच नसल्याचं समोर आलंय.

दरम्यान, या झालेल्या प्रकरणावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलंय. पुण्यात दिलेल्या डिजीटल प्रश्नपत्रिकेच्या लॉकला तांत्रिक अडचण आल्यानं थोडा उशीर झाला, ही वेळ विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात येईल, असं टोपे यांनी म्हटलंय. परीक्षेसाठी केवळ ५ ते १० मिनिटं उशीर झाल्याची माहिती मला मिळाली आहे. त्यानुसार, तेवढा वेळ विद्यार्थांना वाढवून देण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. तसेच त्यांनी परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.