आपल्या प्रेयसीचा ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला आहे यावर विश्वास ठेवण्यास नकार देणाऱ्या 17 वर्षीय तरुणामुळे ऑनर किलिंगचा प्रकार उघड झाला आहे. तरुणाने संशय व्यक्त करताच नाशिक ग्रामीण पोलिसांनी धाव घेत अंत्यसंस्कार होण्याआधी मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. पोलिसांना काही सेकंदाचा जरी उशीर झाला असता तर त्यांच्या हातून महत्त्वाचा पुरावा निसटला असता आणि एका हत्येचा गुन्हा कधीच उघड झाला नसता. तपास केल्यानंतर पोलिसांनी तरुणीच्या वडिलांना आणि चुलत भावाला अटक केली आहे. दोघांवरही तरुणीचा गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. मालेगावमध्ये ही ऑनर किलिंग झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोघा आरोपींना आठ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. पीडित तरुणी 12 वीत शिकत होती. तरुणी तेली जातीतील होती, तर तिचा वर्गमित्र तरुण बुरुड जातीतील आहे. 2017 पासून दोघे प्रेमसंबंधात होते. ‘तरुणीच्या कुटुंबीयांसाठी हे फक्त आंतरजातीय प्रकरण नव्हतं, तर मुलगी इतक्या कमी वयात प्रेमात पडणं त्यांना आवडलं नाही’, अशी माहिती पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली आहे.

1 ऑक्टोबरला तरुणीचा वाढदिवस होता. त्यांच्या ओळखीतील एका व्यक्तीने मुलीला एका मुलासोबत मंदिरात पाहिलं असल्याची माहिती दिली. यानंतर कुटुंबीयांकडून पुढील तीन तासात हत्येचा कट रचण्यात आला अशी माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे. संध्याकाळी मुलीच्या आईने एका दुकानातून झोपेच्या 20 गोळ्या विकत घेतल्या.

मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आपण आणि आपली पत्नी गेल्या वर्षभरापासून तिला मुलाला न भेटू नको असं सांगत होतो. आपली समाजात बदनामी होईल अशी भीती आम्हाला वाटत होती.

एफआयरमध्ये असलेल्या नोंदीनुसार, 1 ऑक्टोबरला कुटुंबीयांनी मुलगी घरी येण्याची वाट पाहिली. मुलगी घरी आल्यानंतर वाढदिवस साजरा करण्याचा बहाणा करत त्यांनी रेस्टॉरंटमधून जेवण मागवलं. ‘कुटुंबीयांनी तिच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि झोपी जाण्याची वाट पाहिली. रात्री 9.30 वाजता त्यांनी मुलीच्या चुलत भावाला बोलावलं’, अशी माहिती पोलीस उपायुक्त अजित हगवणे यांनी दिली आहे.

पोलिसांना दिलेल्या जबाबात मुलीच्या वडिलांनी आपण तिचे पाय धरले होते, तर पत्नीने हात धरले आणि चुलत भावाने गळा दाबत हत्या केली असा धक्कादायक खुलासा केला आहे.

रात्री 1.30 वाजता मुलीच्या आई-वडिलांनी रिक्षामधून मृतदेह रुग्णालयात नेला. मात्र रुग्णालयात त्यांना खासगी रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आलं. खासगी रुग्णालयानेही त्यांना मालेगाव सिव्हील रुग्णालयात जाण्यास सांगितलं. अखेर प्रकरण पोलिसांपर्यंत जाईल या भीतीने आई-वडिलांनी नातेवाईकांना बोलावून ह्रदयविकाराचा झटका आल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली.

तरुणीच्या प्रियकराने सांगितल्यानुसार, जेव्हा मला तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली तेव्हा धक्काच बसला. तिचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला नसल्याची माझी खात्री होती. 2 ऑक्टोबरला सकाळी 10.40 वाजता तरुणाने पोलिसांना फोन करुन संशय व्यक्त केला. पोलीस पोहोचले असता मृतदेहावर अंत्यसंस्काराची तयारी सुरु होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता नातेवाईकांनी विरोध केला. मात्र अखेर पोलिसांना यश मिळालं. शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू गळा दाबल्याने झाला असल्याचं निष्पन्न झालं.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra honour killing tip off from boyfriend reveals murder
First published on: 19-10-2018 at 11:58 IST