Sikandar Shaikh Arrest: आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्रांच्या तस्करी प्रकरणात अटक केली आहे. यानंतर महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात एकच खळबळ उडाली. राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी सिंकदरचे संबंध असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पंजाबच्या मोहाली पोलिसांनी आंतरराज्यीय शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळीचा भांडाफोड करत चार जणांना अटक केली. यात सिंकदरचाही समावेश होता. मात्र सिंकदरला या प्रकरणात गोवण्यात आले आहे आहे, असा आरोप त्याचे कुटुंबिय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

अवैध तस्करीचे प्रकरण काय?

मोहाली पोलिसांनी शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) ही कारवाई केली. अटक केलेल्या आरोपींचा पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी पाच पिस्तूल, जिवंत काडतुसे, रोख रक्कम आणि दोन वाहने जप्त केली. अटक केलेल्यांपैकी दानवीर (२६) आणि बंटी (२६) हे दोघे उत्तर प्रदेशमधील आहेत. कृष्ण कुमार उर्फ हॅप्पी गुर्जर (२२) हा मोहालीचा रहिवासी आहे. तर सिकंदर शेखही (२६) सध्या मोहाली येथे राहण्यास होता.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक हरमनदीप सिंग हंस यांनी दिलेल्या माहितीनुसार, मथुरा येथील दोघजण मोहाली येथे शस्त्र घेऊन येणार आहेत, अशी गुप्त माहिती खरारच्या सीआयए कर्मचाऱ्यांना २४ ऑक्टोबर रोजी मिळाली होती. या माहितीच्या आधारे खरार-मुल्लानपूर विमानतळ रस्त्यावर संशयितांना पोलिसांनी रोखले. त्यांच्याकडे शस्त्रसाठा सापडल्यानंतर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.

रोहित पवार यांना वेगळाच संशय

सिकंदर शेखची अटक झाल्यानंतर कुस्ती जगतामधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणात वेगळे काहीतरी घडले असल्याचे म्हटले. ते म्हणाले, “पै. सिकंदर शेख हा एक गुणी पैलवान असून त्याने आतापर्यंत केवळ त्याच्या गुणवत्तेवरच कुस्ती क्षेत्रात स्वतःचं असं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं. कुस्ती सोडून गुन्हेगारी क्षेत्रात तो जाईल, यावर आमचा बिलकूल विश्वास नाही, कदाचित कुस्तीमध्ये त्याची होत असलेली प्रगती पाहून कुणीतरी त्याला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला असू शकतो.”

“याबाबत महाराष्ट्र सरकारने पंजाब सरकारशी बोलून सिकंदरवर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा चुकीच्या पद्धतीने त्याला अडकवल्यास ते लंबी रेस का घोडा असलेल्या एका मराठी पैलवानावर अन्याय करणारं ठरेल. यासंदर्भात खा. सुप्रियाताईंच्या माध्यमातून पंजाब सरकारशी बोलण्याचा प्रयत्न सुरु असून यातून सकारात्मक मार्ग निघेल”, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.