लाड कुटुंबामध्ये तब्बल सहा दशकानंतर आमदारकी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिगंबर शिंदे, लोकसत्ता

सांगली : पदवीधर मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा विजय झाल्यानंतर घाटाखाली दिवाळी आणि घाटावर सन्नाटा अशी स्थिती शुक्रवारी निर्माण झाली होती. पलूस आणि कडेगाव हे जुळे तालुके असले तरी गेली चार दशके सत्तास्थाने घाटावरच्या कडेगाव तालुक्यातच मिळाली. विशेष म्हणजे क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांच्या जयंतीदिनीच लाड यांच्या कुटुंबामध्ये तब्बल सहा दशकानंतर आमदारकी मिळाली.

स्वातंत्र्य चळवळीमध्ये सशस्त्र क्रांती करणाऱ्यांमध्ये लाड कुटुंबाचा सहभाग होता. क्रांतिअग्रणी म्हणून ओळख असलेल्या जी. डी. बापू लाड यांनी १९५७ मध्ये पहिल्यांदा तासगाव मतदार संघातून विधानसभेत प्रवेश केला होता. त्यानंतर शेकापचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी १९६२ मध्ये विधान परिषदेत काम केले होते. मात्र त्यानंतर त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळाले नाही. ही खंत कुंडलकरांची कायम होती. अरुण लाड यांच्या आजच्या विजयाने ही खंत दूर झाली आहे.

पुणे महसूल विभागातील तब्बल ५७ विधानसभा मतदार संघाचा समावेश असलेल्या पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत राष्ट्रवादीचे लाड यांना पहिल्या पसंतीची १ लाख २२ हजार १४५  मते मिळाली. आजअखेर या मतदार संघामध्ये प्रथम पसंतीची एवढी मते कधीच विजयी उमेदवाराला मिळवता आलेली नव्हती. भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार संग्राम देशमुख यांना ७३ हजार  ३२१ मते मिळाली. म्हणजे तब्बल ४९ हजार  ८२४ मतांची आघाडी घेऊन लाडांचा विजय झाला आहे. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असलेल्या कुंडलच्या मातीत पुरोगामी विचारांचा जागर सातत्याने करणाऱ्या लाड यांच्या विजयाला अनेक पलू जसे आहेत तसेच राज्यातील नव्या राजकीय मांडणीचेही संदर्भ आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी या मतदार संघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले असल्याने त्यांचा वारस त्याच पक्षाचा असेल असा होरा भाजपचा होता. मात्र उमेदवारी देत असताना संघातून पक्ष कार्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचा उमेदवारीसाठी प्रामुख्याने विचार करण्याची पध्दत पहिल्यांदाच भाजपने मोडीत काढली. लाड यांनी गेल्या वेळी निवडणूक बंडखोरी करून लढवली होती. यामुळे भाजपचा विजय सुकर झाला होता. पुन्हा लाडच मदानात येतील असा होरा ठेवून भाजपने एका देशमुखांना मदानात उतरवले. संघाच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर न करता पक्षादेश म्हणून काम करण्यास सांगितले. यातच भाजपच्या पराभवाची बीजे पेरली गेली.

दुसऱ्या बाजूला पक्षासाठी हा विजय महत्त्वाचा होता, तसाच विद्यमान आघाडी सरकारबद्दलचा लोकमताचा कौल काय आहे याची ‘लिटमस टेस्ट’ म्हणून महा विकास आघाडीने पूर्ण ताकदीने या मदानात बाजी मारली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करीत आयात नेतृत्वावर विसंबून असलेल्या भाजपच्या तंबूमध्ये झालेली गर्दी म्हणजे सूज आहे हे दाखवून देण्याची संधी साधली. राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना सोबत घेऊन त्यांनी मदान तर मारलेच पण पश्चिम महाराष्ट्रातील आघाडीतील सर्वाची मदत घेतली. आघाडीत बिघाडी नाही तर एकसंधपणा आहे हे दाखवून देत असताना भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील विस्ताराला पायबंद घालण्याचाही प्रयत्न केला. भाजपच्या देशमुखांचा पराभव करीत असताना केवळ भाजपला पराभूतच केले नाही तर या निकालातून चंद्रकांतदादांनाही एकप्रकारे शह दिला आहे.

 

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra mlc election results 2020 maha vikas aghad arun lad wins in graduate constituency zws
First published on: 05-12-2020 at 01:03 IST