भाजपा अतीआत्मविश्वास दाखवत असून राज्यसभेला केलेली चूक आम्ही यंदा करणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रहित पवार यांनी व्यक्त केलाय. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानभवनामध्ये मतदानासाठी हजर झालेल्या रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यसभेच्या वेळेस केलेली चूक यावेळेस करणार नाही याबद्दल महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी आणि नेत्यांनी काळजी घेतल्याचं सांगितलं. याचवेळेस बोलताना रोहित पवार यांनी विरोधी पक्ष नेते दवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईनची आठवण करुन देत त्यांना अतीविश्वास वाटतोय असा टोलाही लगावला.

नक्की वाचा >> विधानपरिषद निवडणूक: “व्हेंटिलेटरवर त्यांचा श्वास आहे असे म्हणतात, पण…”; पुण्यातील आमदारांवरुन सेनेची भाजपावर टीका

“राज्यसभेने आम्हाला खूप काही शिकवलेलं आहे. विरोधी पक्ष कुठल्याही स्थराला जाऊ शकतो. कुठल्या आमदारावर दबाव आणू शकतो. या साऱ्या गोष्टी आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी पाहिल्या आहेत. निवडणूक आयोगापर्यंत प्रकरण गेलं होतं. पण आम्ही राज्यसभेचा निकाल स्वीकारला. मात्र या निवडणुकीला राज्यसभेच्या वेळेस ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टींबद्दलची काळजी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेली आहे. आमदारांबद्दल विचाराल तर आम्ही महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बाजूने आहोत. गेल्या वेळेस एक मत बाद झालं तर सगळं समिकरण बदललं. या वेळेस प्रत्येक मताची काळजी आम्ही सर्वांनी घेतलीय, असं रोहित पवार म्हणाले.

पुढे बोलताना रोहित यांनी, “आम्हाला विश्वास आहे. तर आमच्या विरोधात असणाऱ्या पक्षाला अतीआत्मविश्वसा आहे. एवढेच सांगू शकतो की सहीच्या सहा उमेदवार निवडून येतील,” असंही म्हटलंय. विरोधी पक्षाकडून विजयाचा दावा केला जात असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला असता रोहित पवार यांनी सूचक विधान करत देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या भाषणाकडे इशारा केला.

नक्की वाचा >> विधानपरिषद निवडणूक: “…म्हणून मी मुंबईला जात आहे”; पुण्याच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक मुंबईकडे रवाना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यांचा (विरोधीपक्ष नेत्यांचा) हा कॉन्फिडन्स पाहिला तर २०१९ चा त्यांचा कॉन्फिडन्स आठवतो. तेव्हा निवडणुकीच्या आधी त्यांचं भाषण फार लोकप्रिय झालं होतं. आता ते जे काही बोलत आहे ते ओव्हर कॉन्फिडन्सने बोलत आहेत. त्यांचा पाचवा जो उमेदवार आहे त्याच्यावर कदाचित खूप मोठी जबाबदारी असावी, वेगवेगळी समिकरणं बसवण्याची. त्यांनी कितीही आत्मविश्वास दाखवला तरी त्यांना २० मतं हवी आहेत. आम्हाला ८ ते ९ मतं हवी आहेत. भाजपाची स्ट्रॅटर्जी असते वातावरण निर्मिती करण्याची. राज्यसभेलाही वातावरण निर्मिती केली. त्यामुळे आमचं हक्काचं मत बाद झालं आणि समिकरणं बदलली. मात्र यावेळेस आम्हाला विश्वास आहे. आम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स नाहीय हे मी सांगू इच्छितो. हे होणारच असं आम्ही म्हणत नाहीय. पण १०० टक्के यश मिळणार,” असं रोहित पवार म्हणाले.

अपक्ष आमदारांची छोटी मोठी नाराजी असतेच. ती दूर करण्यात यश आल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला असून विजय महाविकास आघाडीचाच होणार असही ते म्हणालेत.