Prakash Mahajan On Raj Thackeray : मनसेचं नाशिकमध्ये राज्यस्तरीय शिबीर सुरू आहे. मात्र, या अधिवेशनासाठी आपल्याला बोलवण्यात आलं नाही, त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ‘पक्षाने साथ दिली नाही, पक्षाची सध्या दिवाळी सुरू आहे, पण माझ्या घरी अंधार आहे, पक्षात किंमत नाही. तुम्ही प्रवक्त्याला एवढं तुच्छ समजता?’, असं म्हणत प्रकाश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.
प्रकाश महाजन काय म्हणाले?
“आम्हाला जर पक्ष राज्यव्यापी शिबीरात बोलवलं जात नसेल तर आम्ही जनतेसमोर कोणत्या तोंडाने जावं. घरातच आम्हाला काही मान नसेल तर काय उपयोग?. पक्षाचं एवढं मोठं शिबीर सुरू आहे आणि पक्षाच्या प्रवक्त्याला बोलावलं नाही? कारण त्या निष्कर्षात मी बसत नाही. मग इतरवेळी पक्षाचा प्रवक्ता म्हणून पक्षाची बाजू आम्ही जीव तोडून मांडतो, मग आता प्रवक्त्याला बोलवत नाहीत. मी माझ्या घरी काय तोंड दाखवू? पक्षात आज दिवाळी आहे आणि माझं घर अंधारात आहे”, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.
‘पक्षाने मला साथ दिली नाही…’
“नारायण राणे यांच्या विषयात पक्षाने मला साथ दिली नाही. तरीही मी ते विसरलो. माझं काही चुकलं असेल तर तुम्ही माझे कान धरू शकता. पण दोन्ही भाऊ (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) एकत्र आल्याने माझा काय फायदा होणार होता? मी जनभावना मांडली होती. मग यात मी काय वाईट केलं होतं? पक्षात देखील दोन मतप्रभाव होते. जर आम्हाला तुम्हीचं काही किंमत देत नाहीत तर बाकीचे काय किंमत देतील. मी आज मनसैनिकांना स्पष्ट सांगतो की भविष्यात तुम्हाला गर्व वाटेल की प्रकाश महाजन नावाचा प्रवक्ता आपल्या पक्षात होता”, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.
“मी देव बदलणार नाही, पण देवाने बोलवल्याशिवाय देवळात देखील जाणार नाही. राज ठाकरे आणि अमित ठाकरे व ठाकरे कुटुंबियांवर माझं खूप प्रेम आहे. मी मेलो तरी राज ठाकरे यांचा कार्यकर्ता म्हणूनच मरेन. मी माझ्या कपाळावर कधीही दुसऱ्याचं नाव कोरून घेणार नाही. पण माझी भक्ती खरी असेल तर माझा पांडुरंग मला बोलवेल. तुम्ही अशा प्रकारे एखाद्या जेष्ठ कार्यकर्त्याला अपमानित करणार असाल तर मी हे सहन करणार नाही”, असंही प्रकाश महाजन म्हणाले आहेत.
‘तुम्ही प्रवक्त्याला एवढं तुच्छ समजता?’
“मला खूप यातना होतात. मी चार दिवसांपासून झोपलो नाही. पण वरीष्ठांनी लक्ष दिलं नाही. आता तुम्ही शिबिराला एका प्रवक्त्याला बोलावलं नाही. तुम्ही प्रवक्त्याला एवढं तुच्छ समजता? मग पक्षच अशी वागणूक देत असेल तर मला असं वाटतं की मी का जिवंत राहिलो? तरी तुम्ही म्हणता की मनसेत राहिल्यानंतर कार्यकर्त्यांच्या कुटुंबाला अभिमान वाटेल, काय अभिमान वाटेल? आमच्या पक्षात प्रवक्ता पद एवढं तुच्छ आहे का?”, अशी उद्विग्न प्रतिक्रिया प्रकाश महाजन यांनी दिली आहे.