उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे राज्याध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून, महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

संकट काळात महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याने जनतेसह उभं राहणं महत्त्वाचं-सुनील तटकरे

संकटाच्या या कठीण काळात प्रत्येक नेत्याने महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभं राहणं गरजेचे असल्याचे तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करत थेट पूरग्रस्त भागात भेट दिली. आज ते सोलापूर, धाराशीव आणि बीड या जिल्ह्यांना स्वतः भेट देत असून, स्थानिक मंत्र्यांसोबत पूरपरिस्थितीची पाहणी करत आहेत.

अजित पवार यांनी साधला पीडित नागरिकांशी संवाद

अजित पवार यांनी आज पीडित नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाला तातडीने शेतकऱ्यांसाठी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांनी आपापल्या भागात मदतीचे काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लवकरच आणखी काही मदत योजनांची घोषणा करण्यात येणार असल्याचेही सुनील तटकरे यांनी सांगितले. पक्षाच्या या एकत्रित उपक्रमामुळे पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी खंबीरपणे उभा आहे असेही ते म्हणाले.

सरकार सर्वतोपरी मदत करणार-अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी अजित पवारांकडे मागणी केली की पूरग्रस्तांना सरकारने मदत करावी, अनेक शेतकऱ्यांचं पिक वाहून गेलं आहे, जमिनी खरडून गेल्या आहेत. यावर अजित पवार म्हणाले, “मी हे सगळं पाहायला इथे आलो आहे. पाणी ओसरू द्या, किती रान वाहून गेलं आहे ते पाहू द्या, ज्यांची जमीन खरडून गेली आहे, ज्यांच्या जमिनी नदीकाठी आहेत, ती मळीची जमीन असते ती वाहून गेली असेल तर त्यासंदर्भात आमचा निर्णय झाला आहे. एकदा पाणी ओसरू देत, सर्वांना सरकार मदत करेल.

पूरग्रस्तांसाठी २,२१५ कोटींची मदत जाहीर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणे उभं असून, त्यांना सर्वतोपरी मदत दिली जाईल. आतापर्यंत २,२१५ कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच प्रचलित निकषांमध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांना आणखी मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.