Maharashtra Political Crisis Updates, 22July 2022 : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुरू केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ  कॉंग्रेसच्या वतीने राज्यभरात करण्यात आलेल्या निदर्शनांमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा शाब्दिक संघर्ष या विषयावरुन आजही पहायला मिळण्याची शक्यता आहे. सरकारच्या हुकूमशाहीच्या विरोधात आता आरपारची लढाई केली जाईल असं काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं असून या विषयावरुन आज आरोप प्रत्यारोप केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय ईडीच्या माध्यमातून कारवाई करण्यात आलेल्या आणखीन एका प्रकरणामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची चिन्हं आज दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित वरळीतील सीजे हाऊस इमारतीतील चार मजल्यांवर ईडीने टाच आणली आहे. दाऊद इब्राहिमचा विश्वासू इक्बाल मिर्ची कुटुंबियांशी या जागेचा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत ‘ईडी’ तपास करत असून पटेल यांच्याविरोधातील कारवाईवरुनही आज राजकारण तापण्याची शक्यता आहे.

गेली दोन वर्षे करोनाच्या सावटाखाली साजऱ्या होणाऱ्या सणोत्सवांवरील सर्व निर्बंध हटविण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केल्यानंतर सध्या सरकारच्या या निर्णयावर समाधान व्यक्त केलं जात आहे. दहिहंडी, गणशोत्सव, मोहरमवर कोणतेही अवास्तव निर्बंध लागू करू नका, नियमांचा बाऊ करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असून या निर्णयाचं स्वागत होताना दिसत आहे.

Lok Sabha Election 2024 Live Updates Maharashtra Politics News
Maharashtra News : “यंदाची निवडणूक शेवटची ठरू नये”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले, “ज्यांच्या हाती…”
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
Political Speculation Swirls as Former Minister Ambrishrao Atram Remains Absent from Campaigning in Gadchiroli Chimur
भाजपच्या प्रचारात अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अनुपस्थितीची चर्चा; मन वळविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची मध्यस्थी
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
Maharashtra News : गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) द्रौपदी मुर्मू यांनी विजय मिळवला असून देशभरामध्ये यासंदर्भातील जल्लोष पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी या विजयाच्या दुसऱ्या दिवशीही आनंद साजरा केला जात आहे. याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत असणार आहे.

महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…

Live Updates

Maharashtra News Today : राष्ट्रपती निवडणुकीतील विजयानंतरचा जल्लोष ते ईडी कारवाईवरुन संघर्ष

20:32 (IST) 22 Jul 2022
"आदित्य ठाकरे वाघच पण..," शिंदे गटातील आमदार सुहास कांदेंची खोचक टीका

आदित्य ठाकरे आज मनमाड दौऱ्यावर असताना शिंदे गटातील आमदार सुहास कांदे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. आदित्य ठाकरेंनी मनमाडच्या विकासासाठी काहीही केले नाही, असा आरोप कांदे यांनी केला. तसेच एका सभेमध्ये बोलताना कांदे यांनी आदित्य ठाकरे हे वाघच आहेत. मात्र त्यांनी भूमिका बदलली. त्यांनी मटणाऐवजी डाळ-भात खाण्यास सुरुवात केली, असा टोला लगावला. वाचा सविस्तर

20:25 (IST) 22 Jul 2022
शिंदे-फडणवीस दिल्ली दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

20:13 (IST) 22 Jul 2022
धैर्यशील मानेंविरोधात शिवसैनिक आक्रमक

धैर्यशील मानेंविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिक माने यांचे घर तसेच कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. येणाऱ्या २५ जुलै रोजी हातकणंगले मतदारसंघातील सिवसैनिकांना घेऊन कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव हा मोर्चा काढणार आहेत.

19:06 (IST) 22 Jul 2022
कोल्हापूर : हुपरी नगरपरिषदेत तृतीयपंथीयाची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

चांदीनगरी हुपरी नगरपरिषदेत तृतीयपंथीयाची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. विधवा प्रथा बंदीच्या निर्णयानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे हे आणखी एक पुरोगामी पाऊल पडले आहे. वाचा सविस्तर बातमी...

18:44 (IST) 22 Jul 2022
ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांचे पुण्यात निधन

ज्येष्ठ लेखक, कांदबरीकार अनंत उर्फ नंदा खरे यांचे आज (२२ जुलै) पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. मराठी साहित्यातील विविध प्रांतात मोलाची भर घालणारे खरे विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टीचा पुरस्कार करणारे लेखक म्हणून ते ओळखले जायचे. वाचा सविस्तर बातमी...

17:58 (IST) 22 Jul 2022
आपत्कालीन साखळी ठरतेय मध्य रेल्वेसाठी डोकेदुखी; वेळापत्रक कोलमडण्यासही कारणीभूत

मध्य रेल्वेवरील गाड्या तांत्रिक बिघाडामुळे विलंबाने धावत असून लोकल, मेल, एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांमधील आपत्कालीन साखळी खेचल्यामुळे होणारा खोळंबाही वेळापत्रक कोलमडण्यास कारणीभूत ठरत आहे. काही प्रवासी विनाकारण आपत्कालीन साखळी खेचत असून आता हा प्रकार मध्य रेल्वेसाठी नेहमीची डोकेदुखी होऊन बसला आहे. दरम्यान ४ ते १७ जुलै २०२२ या कालावधीत मध्य रेल्वे मुंबई विभागात विनाकारण आपत्कालीन साखळी खेचल्याच्या १२० प्रकरणांची नोंद झाली. या प्रकरणी ७१ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वाचा सविस्तर बातमी...

17:25 (IST) 22 Jul 2022
पाठीत खंजीर कुणी खुपसला? रामदास कदम यांचं आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिकमधील मनमाड दौऱ्यावर आहेत. ‘शिव संवाद’ यात्रेच्या माध्यमातून ते महाराष्ट्रभर फिरत असून शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधत आहेत. दरम्यान ते बंडखोर आमदारांवर जोरदार टीका करतानादेखील दिसत आहेत. त्यामुळे आता ठाकरे कुटुंबांवर टीका करायची नाही, अशी भूमिका घेतलेले शिंदे गटातील नेते बोलू लागले असून आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देऊ लागले आहेत. सविस्तर बातमी

16:43 (IST) 22 Jul 2022
पवई तलावात आढळल्या १८ मगरी; मुंबई महापालिकेकडून करण्यात आली मोजणी

पवई तलावात मोठया प्रमाणात मगरींचा अधिवास असून मुंबई महानगरपालिकेने केलेल्या मोजणीमध्ये पवई तलावात साधारण १८ प्रौढ मगरी असल्याचे निदर्शनास आले आहे. वाचा सविस्तर बातमी...

16:28 (IST) 22 Jul 2022
मुंबईत खड्डे भरण्याचा प्रयोग; चार ठिकाणी वेगवेगळ्या चार अभियांत्रिकी पद्धतीची चाचपणी

पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी शीत डांबरमिश्रीत खडी (कोल्ड मिक्स) कुचकामी ठरू लागल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने आता नवीन तंत्रज्ञानाची चाचपणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने आज (शुक्रवार) चार ठिकाणी नवीन अभियांत्रिकी पद्धतींची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी केली. वाचा सविस्तर बातमी...

16:15 (IST) 22 Jul 2022
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मुंबईतील कामाला गती मिळणार

बहुचर्चित मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मुंबईमधील कामांना खिळ बसली असतानाच, केंद्र आणि राज्य सरकारने आता या प्रकल्पाला गती देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुबंईतील वांद्रे – कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेन स्थानकाचा आराखडा, बांधकाम, तसेच २१ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाच्या कामांसाठी फेरनिविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमाद्वारे दिली. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने या दोन्ही कामांच्या निविदा रद्द केल्या होत्या. वाचा सविस्तर बातमी...

16:12 (IST) 22 Jul 2022
कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. ३ रिश्टर स्केल एवढी तीव्रता नोंदवली गेली असून, धारणापासून १२ किलोमीटर तर हेळवाकच्या नैऋत्येस ७ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

15:46 (IST) 22 Jul 2022
आदित्य ठाकरेंनी विकासकामांची काढली यादी, भर सभेत दिला हिशोब

सुहास कांदे यांच्या टीकेला आदित्य ठाकरे यांनी त्यांचे नाव न घेता उत्तर दिले आहे. शिवसैनिकांनी प्रश्न विचारले तर मी उत्तर द्यायला कटीबद्ध आहे. गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नाही, असे आदित्य ठारे म्हणाले आहेत. वाचा सविस्तर

14:57 (IST) 22 Jul 2022
गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते- आदित्य ठाकरे

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिकमधील मनमाड दौऱ्यावर असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनमाडच्या विकासात आदित्य ठाकरेंचं एक टक्कादेखील योगदान नाही. नांदगाव मतदारसंघात येऊन तुमच्या पर्यटन खात्याचा एक प्रकल्प दाखवा, असे आव्हान कांदे यांनी आदित्य ठाकरेंना केले आहे. कांदे यांच्या याच आव्हानाला आदित्य यांनी उत्तर दिले आहे. शिवसैनिकांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला मी कटीबद्ध आहे. गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते, असे आदित्य ठाकरे यांनी कांदे यांच्यावर त्याचे नाव न घेता टीका केली आहे. वाचा सविस्तर

14:56 (IST) 22 Jul 2022
"लिहून घ्या, हे सरकार कोसळणार," आदित्य ठाकरेंचे मोठं विधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. शिवसेनेचे १२ खासदारदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. असे असताना शिवसेना पक्षाची जबाबदारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या खांद्यावर घेतली असून ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात मेळावे, सभा तसेच शिवसैनिकांच्या भेटी घेत आहेत. आज मनमाड दौऱ्यावर असताना त्यांनी विद्यमान सरकार जास्त काळ टिकणार नाही. हे सरकार कोसळणार आहे, असे खळबळजनक विधान केले आहे. वाचा सविस्तर

14:45 (IST) 22 Jul 2022
‘बेस्ट’च्या आणखी १०० बसगाड्यांमध्ये लवकरच ‘टॅप इन टॅप आऊट’ सेवा

बेस्ट उपक्रमाने बसचे तिकीट काढताना होणारा रोख रक्कमेचा व्यवहार टाळण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञानावर आधारित ‘टॅप इन टॅप आऊट’ सेवाही सुरू केली. मात्र सध्या मोजक्याच बसमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे बहुसंख्य प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे येत्या १५ ते २० दिवसांमध्ये बेस्टच्या ताफ्यातील आणखी १०० बसगाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती उपक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली. वाचा सविस्तर बातमी...

14:31 (IST) 22 Jul 2022
मुंबईतील दुकाने किंवा आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ

मुंबईतील दुकाने किंवा आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेने याबाबतची माहिती आज (शुक्रवार) उच्च न्यायालयात दिली. त्यानंतर मुदतवाढीच्या मागणीसाठी हॉटेल मालकांच्या संघटनेने केलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली. वाचा सविस्तर बातमी...

14:14 (IST) 22 Jul 2022
फडणवीस समर्थकांकडून शाहांबद्दल नाराजी व्यक्त केली जात असतानाच शाह मोदींचा उल्लेख करत म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांना..."

जातीय समीकरणं आणि सत्तास्थापनेची तडजोड करण्यासाठी फडणवीसांना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे पद देण्यात आल्याची नाराजी फडणवीसांचा बालेकिल्ला असणाऱ्या नागपूरमध्ये पहायला मिळाली. नागपूरमध्ये फडणवीस यांचं अभिनंदन करणाऱ्या पोस्टर्स, बॅनर्सवरुन अमित शाह यांचा फोटो गायब होते. या साऱ्या नाट्यानंतर आज फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त अमित शाह यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना केवळ शुभेच्छाच दिल्या नाहीत तर त्यांचं कौतुकही केलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त...

https://twitter.com/LoksattaLive/status/1550387745230815239

14:06 (IST) 22 Jul 2022
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथग्रहण सोहळ्यावेळीचे स्नेहभोजन शाकाहारी ठेवावे : डॉ. कल्याण गंगवाल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा २५ जुलै रोजी शपथग्रहण सोहळा नियोजित आहे. अध्यात्मिक बैठक असणाऱ्या मुर्मू यांनी या शपथग्रहण सोहळ्यावेळी राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात येणारे स्नेहभोजन शुद्ध शाकाहारी ठेवावे, अशी मागणी शाकाहारचे पुरस्कर्ते व सर्वजीव मंगल प्रतिष्ठानणचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली. या मागणीचे निवेदन ई मेलद्वारे राष्ट्रपती भवन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. वाचा सविस्तर बातमी...

13:39 (IST) 22 Jul 2022
पुणे महापालिका निवडणुकीत १०० प्लस नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा निर्धार : जगदीश मुळीक

राज्यातील जनतेने मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार पाहिलं आहे. त्या संपूर्ण कालावधीत भ्रष्टाचार घडला. त्यामुळे त्यांचे दोन मंत्री गजाआड झाले आहेत, तर अनेक मंत्री त्याच मार्गावर आहेत. या भ्रष्टाचारी कारभाराला जनता वैतागली आहे. यामुळे येणार्‍या पुणे महापालिका निवडणुकीत १०० प्लस नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा निर्धार आहे आणि हीच देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाची भेट असणार आहे. असे मत भाजपाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले. वाचा सविस्तर बातमी...

13:25 (IST) 22 Jul 2022
सुहास कांदेंच्या आरोपांना दादा भुसेंचा दुजोरा

उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच एकनाथ शिंदे यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली नाही, असा गंभीर आरोप सुहास कांदे यांनी केला होता. कांदे यांच्या आरोपाला माजी कृषिमंत्री दादा भुसे यांनी दुजोरा दिला आहे. ''सुहान कांदेंनी केलेल्या आरोपात तथ्य आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली होती. मात्र, तरीही एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्यात आली नाही, असे दादा भुसे यांनी म्हटले आहे.

सविस्तर बातमी

13:07 (IST) 22 Jul 2022
“धमक्या कोणाला देत आहात?”, केसरकर आदित्य ठाकरेंवर संतापले

शिवसेना नेते आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून बंडखोर आमदारांवर जोरदार टीका करत आहेत. बंडखोर आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं असं आव्हानही आदित्य ठाकरेंनी दिलं असून यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आमदारांवर होणाऱ्या टीकेवरुन संताप व्यक्त करत जोरदार प्रत्युत्तर दिलं. दीपक केसरकर यांच्यासोबत यावेळी दादा भुसे, संजय राठोडदेखील उपस्थित होते.

सविस्तर बातमी

13:05 (IST) 22 Jul 2022
जुहू समुद्रकिनाऱ्यावर ‘ब्लू बॉटल’, पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण

हवा भरलेल्या निळ्या पिशवीसारखे दिसणारे ‘ब्लू बॉटल’ जेलीफिश ‘पोर्तुगीज मॅन ओ वॉर’ या नावानेही ओळखला जातात. ब्लू बॉटल ‘सिफोनोफोर’ कुळातील आहेत. पावसाळ्यात समुद्राकडून जमिनीच्या दिशेला प्रचंड वेगाने वारे वाहत असतात. भरतीच्या वेळी किनाऱ्यावर लाटा धडकत असतात. त्यामुळे वजनाने हलके असलेले जेलीफिश समुद्रकिनाऱ्यावर पोहोचतात. त्यापैकीच एक असलेला ‘ब्लू बॉटल’ जेलीफिश विषारी म्हणूनच ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या सागरी परिसंस्थेचा अभ्यास करणाऱ्या ‘मरिन लाइफ ऑफ मुंबई’च्या कार्यकर्त्यांना जुहू समुद्रकिनाऱ्यावर ‘ब्लू बॉटल’ दिसले. वाचा सविस्तर बातमी...

12:49 (IST) 22 Jul 2022
CBSE 12th Result 2022 : महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल ९०.४८ टक्के

पुणे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. एकूण ९२.७१ टक्के लागला असून, महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल ९०.४८ टक्के लागला. देशपातळीवर १ लाख ३४ हजार ७९७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. वाचा सविस्तर बातमी...

12:36 (IST) 22 Jul 2022
पिंपरी महापालिकेत ३८ जागा ओबीसींसाठी आरक्षित होणार?

पिंपरी महापालिकेच्या १३९ जागांपैकी ३८ जागा ओबीसींसाठी आरक्षित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनुसूचित जाती आणि जमातीचे यापूर्वी निश्चित केलेले आरक्षण कायम राहणार आहे. ओबीसी आरक्षणासह निवडणुका झाल्यास पिंपरी पालिकेतील जागांची समीकरणे व राजकीय गणिते पूर्णपणे बदलणार आहेत. वाचा सविस्तर बातमी...

12:15 (IST) 22 Jul 2022
Pune Municipal Election : निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग? ; कायदेशीर प्रक्रियेची तपासणी

राज्यातील सत्तांतर आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाल्यानंतर आगामी निवडणुकीसाठी शहरात चार नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीने निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याबाबाबतची कायदेशीर प्रक्रिया तपासण्यास येत आहे. बहुसदस्यीय पद्धत भारतीय जनता पक्षासाठी अनुकूल असून, तीन नगरसेवकांचा प्रभाग करताना राष्ट्रवादीने चुकीची रचना केल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केल्याने प्रभाग रचना बदलाची शक्यता आहे. पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांनी तशी थेट मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. वाचा सविस्तर बातमी...

12:04 (IST) 22 Jul 2022
मुंबई : तलावांतील पाणी पातळी कमी होऊ लागली; पाणीसाठा ८७.६५ टक्क्यांवर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोटक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली असून तलावांतील पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा मुबलक असला तरी गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी त्यात एक टक्क्याने घट झाली असून, सातही तलावांमधील आज (शुक्रवार) ८७.६५ टक्के पाणीसाठा आहे. वाचा सविस्तर बातमी...

12:03 (IST) 22 Jul 2022
नाना पटोले कथित Viral Video प्रकरण: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, “संबंधित पिडिता तक्रार…”

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा चेरापुंजीमधील एक कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटरवरुन नाना पटोले एका महिलेसोबत चेरापुंजी येथे असल्याचा दावा करणारा व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली होती. नाना पटोलेंनी हा मला बदनाम करण्याचा प्रकार असल्याचं उत्तर या प्रकरणावर बोलताना दिलं होतं. आता याच प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पहिल प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यामधील जनसुनावणीच्या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना चाकणकर यांना या प्रकरणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. येथे वाचा रुपाली चाकणकर नेमकं यावर काय म्हणाल्या...

https://twitter.com/LoksattaLive/status/1550366291978231808

11:28 (IST) 22 Jul 2022
अमित ठाकरेंचा दादर ते अंबरनाथपर्यंत लोकल ट्रेनने प्रवास

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी आज(शुक्रवार) दादर ते अंबरनाथ असा लोकल ट्रेनने प्रवास केला. सध्या त्यांनी राज्यभरातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी महासंपर्क अभियान सुरू केले आहे. या निमित्त ते राज्यभरात विविध ठिकाणी दौरे करत आहेत. वाचा सविस्तर बातमी...

11:22 (IST) 22 Jul 2022

Devendra Fadnavis Birthday Special: सर्वात तरुण महापौर ते उपमुख्यमंत्री; जाणून घ्या देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास

राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा वॉर्ड अध्यक्ष ते उपमुख्यमंत्रीपदाचा प्रवास जाणून घेऊया.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

11:19 (IST) 22 Jul 2022

Photos : तीन कोटींचे कर्ज, महागड्या गाड्या अन् जमीन…अजित पवार आणि त्यांच्या पत्नीची एकूण संपत्ती माहितीये का?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आज ६३वा वाढदिवस आहे. ते अनेकदा त्यांच्या भाषणामुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या एकूण मालमत्तेवर एक नजर टाकूया.

फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा

11:10 (IST) 22 Jul 2022
मुंबईत रुग्णांमध्ये वाढ, तात्काळ उपाययोजना करा, भाजपा नेत्याचं पालिका आयुक्तांना पत्र

मुंबईत जुलैच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नुकतीच विश्रांती घेतली असली तरी आठ दिवसांतच लेप्टोच्या रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढली आहे. जुलैमध्ये लेप्टोचे ११ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचा ही प्रादुर्भाव कायम असून ३३ रुग्णांचे निदान झाले आहे. यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी केली आहे. अमित साटम यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र लिहिलं आहे.

सविस्तर बातमी

11:09 (IST) 22 Jul 2022
पुणे : धरणक्षेत्रात तुरळक पावसाची हजेरी; पाणीसाठा ६८ टक्क्यांवर

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात पावसाने उघडीप दिली. चारही धरणांमध्ये शुक्रवारी सकाळपर्यंत तुरळक पावसाने हजेरी लावली. सध्या धरणांमधील पाणीसाठा २०.०० अब्ज घनफूट (टीएमसी) ६८.६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. वाचा सविस्तर बातमी...

11:03 (IST) 22 Jul 2022
“एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं”

नक्षलवाद्यांच्या धमकीनंतरही एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवू नका असं उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना सांगितलं होतं, असा दावा शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे मनमाड दौऱ्यावर असून आपण त्यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच आदित्य ठाकरेंनी आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली तर राजीनामा देण्यास तयार आहोत असंही म्हटलं आहे.

सविस्तर बातमी

11:01 (IST) 22 Jul 2022
दिल्ली: विरोधी पक्षाच्या खासदारांचं संसदेसमोर आंदोलन

विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज अधिवेशनाचं कामकाज सुरु होण्यापूर्वी संसदेच्या इमारतीसमोर महागाई आणि दैनंदिन जीवनातील वापराच्या वस्तूंच्या वाढत्या किंमतीविरोधात आंदोलन केलं.

https://twitter.com/ANI/status/1550343391237779456

10:57 (IST) 22 Jul 2022
नेमकं राष्ट्रपती कोण झालंय? मुर्मू यांचं अभिनंदन करणारी मुख्यमंत्री शिंदेंची पोस्ट पाहून लोकांना पडला प्रश्न; फोटो ठरतोय चर्चेचा विषय

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) द्रौपदी मुर्मू यांनी ६ लाख ७६ हजार ८०३ इतके मतमूल्य मिळवून विजय मिळवला. विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या पारडयात केवळ ३ लाख ८० हजार १७७ इतके मतमूल्य जमा झाले. या विजयानंतर सर्वच स्तरामधून मुर्मू यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीनेही मुर्मू यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे. पण त्यांची पोस्ट वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

https://twitter.com/LoksattaLive/status/1550338329404907520

10:56 (IST) 22 Jul 2022
भाजपा आमदाराने फडणवीसांची प्रभू रामचंद्रांशी केली तुलना; म्हणाले, “मी माझ्या श्रीरामाच्या…”

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. करोनाच्या निर्बंधांनंतर पहिल्यांदाच भाजपा कार्यकर्त्यांकडून यंदा मोठ्या उत्साहामध्ये फडणवीस यांचा वाढदिवस वेगवेगळ्या समाज उपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जात आहे. असं असतानाच दुसरीकडे भाजपा आमदाराची एक पोस्ट सध्या तुफान चर्चेत आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...

https://twitter.com/LoksattaLive/status/1550349736385052672

10:33 (IST) 22 Jul 2022
अन् माकडांनी पार केला ‘हरितसेतू’ ; वनविभागाच्या मोहिमेला यश

माकडांना पुराच्या पाण्यातून सोडवण्यासाठी वनखात्याने स्वयंसेवींच्या मदतीने उभारलेल्या ‘हरितसेतू’ पार करून गुरुवारी सातपैकी सहा माकडांनी नैसर्गिक अधिवास गाठला.

10:19 (IST) 22 Jul 2022
पिंपरी: ८०० विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात – वाल्हेकरवाडीची शाळा मोडकळीस

पिंपरी महापालिकेची वाल्हेकरवाडी येथील प्राथमिक शाळा धोकादायक अवस्थेत आहे. बालवाडी ते सातवीपर्यंतचे जवळपास ८०० विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शाळेतील विद्यार्थ्यांवर धोक्याची टांगती तलवार असून कधीही काहीही होऊ शकते, अशी सध्याची स्थिती आहे. पालिकेने पर्यायी शाळा उभारण्याचा पर्याय दिला, मात्र त्या शाळेचे काम रडतखडत सुरू आहे. वाचा सविस्तर सविस्तर....

09:58 (IST) 22 Jul 2022
नागपूर : …आता ‘स्वाईन फ्लू’चा धोका, सहा दिवसांत ८ रुग्ण आढळले

नागपूरमध्ये करोनासह ‘संसर्गजन्य’ आजाराचे रुग्ण वाढत असतानाच आता ‘स्वाईन फ्लू’चे संक्रमण वाढताना दिसत आहे. मागील सहा दिवसांत येथे ८ नवीन रुग्ण आढळल्याने, येथील आजपर्यंतच्या ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांची संख्या १४ वर पोहचली आहे. त्यापैकी ८ गंभीर संवर्गातील रुग्ण विविध रुग्णालयांत आहेत. वाचा सविस्तर बातमी...

09:57 (IST) 22 Jul 2022
कधी न ऐकलेली प्रेम कहाणी : ‘ट्रान्सवूमन’ आणि ‘ट्रान्समेन’ अडकले विवाह बंधनात

महाराष्ट्रातील एक अनोखा प्रेम विवाह नुकताच पिंपरी-चिंचवड शहरात पार पडला आहे. ट्रान्सवूमन आणि ट्रान्समेन हे दोघे विवाह बंधनात अडकले आहेत. रूपा टाकसाळ आणि प्रेम लोटलीकर अशी दोघांची नावं आहेत. त्यांचा प्रेमविवाह झाला आहे असे ते अभिमानाने सांगतात. ट्रान्सवूमन आणि ट्रान्समेन यांच्यातील झालेला विवाह सोहळा हा महाराष्ट्रातील पहिलाच असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

09:56 (IST) 22 Jul 2022
ठाणे : झोपडीवर ट्रक उलटल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू ; ट्रक चालक ताब्यात

मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा भागात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्यालगत असलेल्या झोपडीवर उलटला. या घटनेत झोपडीमध्ये झोपलेल्या १४ वर्षीय मुलगी मधू भाटी हिचा मृत्यू झाला. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. वाचा सविस्तर बातमी...

09:52 (IST) 22 Jul 2022
वरळीतील सीजे हाऊसच्या चार मजल्यांवर ‘ईडी’ची कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित वरळीतील सीजे हाऊस इमारतीतील चार मजल्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे.  दाऊद इब्राहिमचा विश्वासू इक्बाल मिर्ची कुटुंबियांशी या जागेचा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत ‘ईडी’ तपास करत आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त...

https://twitter.com/LoksattaLive/status/1550331186085384193

09:51 (IST) 22 Jul 2022
नागपूर : ...आता 'स्वाईन फ्लू'चा धोका, सहा दिवसांत ८ रुग्ण आढळले

नागपूरमध्ये करोनासह ‘संसर्गजन्य’ आजाराचे रुग्ण वाढत असतानाच आता ‘स्वाईन फ्लू’चे संक्रमण वाढताना दिसत आहे. मागील सहा दिवसांत येथे ८ नवीन रुग्ण आढळल्याने, येथील आजपर्यंतच्या ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांची संख्या १४ वर पोहचली आहे. त्यापैकी ८ गंभीर संवर्गातील रुग्ण विविध रुग्णालयांत आहेत. येथे वाचा सविस्तर वृत्त

https://twitter.com/LoksattaLive/status/1550328468184805377

09:50 (IST) 22 Jul 2022
डी. एस. कुलकर्णींना जामीन मंजूर; MOFA प्रकरणामध्ये पुणे न्यायालयाने दिला जामीन

बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी ऊर्फ डी. एस. कुलकर्णी यांना पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सदनिकांच्या मालकी हक्कासंदर्भात महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स अ‍ॅक्ट (MOFA, मोफा) अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आलाय. २०१६ साली त्यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला. येथे वाचा सविस्तर वृत्त

https://twitter.com/LoksattaLive/status/1550305268718014464

Sonia-Gandhi-new

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुरू केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ  कॉंग्रेसच्या वतीने राज्यभरात करण्यात आलेल्या निदर्शनांमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा शाब्दिक संघर्ष या विषयावरुन आजही पहायला मिळण्याची शक्यता आहे.