Top 5 Maharashtra Politics News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्याच्या कोरेगाव पार्क येथे खरेदी केलेल्या जमिन वादात सापडली आहे. या प्रकरणात विरोधकांकडून अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. दरम्यान या प्रकरणात राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अजित पवारांनी देखील याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे.

१) पार्थ पवारांवरील आरोपांवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीवर होत असलेल्या आरोपांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माध्यमांनी जे काही प्रकरण चालवले आहे. त्याची पूर्ण माहिती आता माझ्याकडे नाही. माझा त्या गोष्टीशी थेट किंवा दुरान्वयेदेखील संबंध नाही. ३५ वर्षांपासून महाराष्ट्रातील जनता मला ओळखते. मी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेण्याचे ठरवले आहे. दोन-चार महिन्यांपूर्वी असे काहीतरी चालू असल्याचे माझ्या कानावर आले होते. कोणत्याही चुकीच्या गोष्टी करू नयेत, अशा सूचना मी दिल्या होत्या. पण मधल्या काळात काय झाले? मला माहीत नाही”, असे अजित पवार म्हणाले.

“मी आजपर्यंत कधीही माझ्या जवळच्या किंवा दूरच्या नातेवाईकाला लाभ होईल, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेले नाहीत. मी कधीही अधिकाऱ्यांना फोन करून काही आदेश दिलेले नाहीत. उलट यानिमित्ताने उपमुख्यमंत्री म्हणून मी सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगेन की, जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचे करत असेल किंवा नियमात न बसणारे काम करत असेल तर त्याला माझा पाठिंबा नसेल. मी कायद्याच्या आणि नियमाच्या चौकटीत राहून काम करणारा माणूस आहे,” असेही अजित पवार पुढे बोलताना म्हणाले.

२) “देवेंद्र फडणवीस जे बोलले तसं वागले हे दाखवा आणि…”, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्‍यांना प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे विकासावर बोलले आहेत असं दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर आता उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले मी टोमणे मारत नाही. मी बळीराजाचे प्रश्न मांडतो आहे. देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या आधी काय म्हणाले होते? शेतकऱ्याचा सातबारा आम्ही करणार कोरा कोरा कोरा. आता माझं त्यांना आव्हान आहे देवेंद्र फडणवीस जसं बोलले तसं वागले हे दाखवा आणि दोन हजार रुपये मिळवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बोले तैसा चाले असं दाखवा आणि दोन हजार रुपये मिळवा. मी मुख्यमंत्री असताना हे स्वतः म्हणायचे ओला दुष्काळ जाहीर करा आणि आता म्हणतात की, ओला दुष्काळ असं काही नसतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली होती तसं तुम्ही भाजपसाठी मतबंदी करणार का?, आता पुन्हा हे निवडणुकांमध्ये भुलथापा देणार, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

३) “आत्या मी काही चूक….”; पार्थ पवारांनी सुप्रिया सुळेंना काय सांगितलं?

पार्थ पवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी जमीन खरेदी प्रकरणाच्या आरोपांबाबत पार्थ पवारांशी बोलणं झालं का? याबद्दल खुलासा केला. ‘आत्या मी काही चूक केली नाही’, असं पार्थ पवार हे सुप्रिया सुळे यांच्याशी फोनवर बोलताना म्हटले असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

“पुण्यातील जमीनीचं प्रकरण नेमकं काय आहे? हे राज्याच्या सरकारने स्पष्ट केलं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट करायला पाहिजे. कारण सर्व संभ्रम आहे, या प्रकरणात माझे तीन प्रश्न आहेत. माझा पहिला प्रश्न आहे की ही जमीन सरकारी होती, तर मग ती विकता येते का? जर विकता येत असेल तर नियमाप्रमाणे व्यवहार झाला का? दुसरा महत्वाचा मुद्दा तहसीलदार म्हणतात की मी त्यावर स्वाक्षरी केली नाही, मग जर स्वाक्षरी केली नसेल तर व्यवहार कसा झाला?”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

पार्थ पवारांशी काही बोलणं झालं का? याबद्दल सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “हो, सकाळीच पार्थ पवारांना फोन केला आणि विचारलं की नेमकं विषय काय आहे जरा समजून तरी सांगा. त्यावर पार्थ पवार मला म्हणाले की आत्या मी काहीही चूक केलेली नाही आणि माझ्या वकिलांशी माझं बोलणं झालं आहे. मग जर पार्थ पवारांचं वकिलांशी बोलणं झालं असेल तर वकील याबाबत स्पष्टीकरण देतील”, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

४) पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

नागपूर येथे बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सदर प्रकरणासंदर्भात मी सर्व माहिती मागवली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्ड्स याची सर्व माहिती मागितली आहे. योग्य ते चौकशीचे आदेशही मी दिलेले आहेत. सर्व माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर मी जे सांगायचे ते सांगेन.”

फडणवीस पुढे म्हणाले, “अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही. प्राथमिकदृष्ट्या जे मुद्दे समोर येत आहेत. ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याबाबत योग्य माहिती घेऊनच बोलले पाहिजे. त्यादृष्टीने आज माहिती मिळाल्यानंतर शासनाची पुढची कारवाई काय आहे, त्याबाबत दिशा स्पष्ट करू.”

“उपमुख्यमंत्रीही (अजित पवार) अशा कुठल्याही प्रकाराला पाठिशी घालतील असे माझे मत नाही. यासंदर्भात आमच्या सरकारचे एकमत आहे. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. या मताचे आम्ही आहोत. अनियमितता झाली आहे का? हे पडताळून पाहिले पाहिजे. अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल”, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली.

५) जमीन व्यवहार घोटाळ्याच्या आरोपांवर मंत्री बावनकुळेंचा इशारा; “माझ्याकडे तक्रार आल्यास लगेच…”

पार्थ पवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडे तक्रार आली की मी लगेच कारवाई सुरू करणार, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. “आतापर्यंत माझ्याकडे कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. मला सकाळी अंजली दमानिया यांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की मंगळवारी संपूर्ण केस त्या माझ्याकडे फाईल करणार आहेत. आता प्रश्न राहिला महार वतन जमीनीबाबत निर्णय घेण्याचा, तर त्याबाबत एक विशेष कायदा आहे. आपल्याला त्यात तपासावं लागेल की या जमीन कायद्यानुसार तो व्यवहार झाला की नाही?”, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे.

“तसेच मुद्रांक शुल्क माफ करण्याच्या संदर्भातील देखील एक कायदा आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणत्या नियमांखाली मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात आली? हे उद्योग विभाग तपासेल. कारण जेव्हा एमआयडीसी प्रकल्पांच्या नियमामध्ये एखाद्या प्रकल्पाला सवलत दिली असेल तर ती सवलत नियमात दिली गेली आहे का की नाही हे उद्योग विभाग तपासेल. कारण जेव्हा आयटी पार्कचं धोरण आलं होतं तेव्हा मंत्रिमंडळाने काही सवलती जाहीर केल्या होत्या. मग त्या सवलतीमध्ये हे प्रकरण येत आहे का की नाही? किंवा परस्पर सवलती देण्यात आल्या आहेत? याबाबत अंजली दमानिया ११ तारखेला माझ्याकडे तक्रार करणार आहेत. त्यानंतर मी त्यावर तपासणी करेन”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी “माझ्याकडे तक्रार आली की मी कारवाई सुरू करतो,” असेही स्पष्ट केले.