Maharashta Politics top 5 statments : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात हलचालींना चांगलाच वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. यातच महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांकडून निवडणुक प्रक्रियेवर शंका उपस्थित केल्या जात आहे. यासंबंधी चर्चा करण्यासाठी या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे महाविकास आघाडीबरोबर जाणार का?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी, प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडीत सहभागी होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भाष्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, “मी यापूर्वी देखील महाविकास आघाडीबरोबर दिसलो होतो. मी २०१७ मध्ये देखील विरोधी पक्षांच्या आघाडीबरोबर दिसलो होतो आणि तेव्हादेखील मतदार याद्यांच्या घोळावरून प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, “आम्ही सर्वच पक्षांना बोलावलं होतं.”
राज ठाकरे म्हणाले, “सध्या मतदार याद्यांचा विषय महत्त्वाचा आहे. आता निवडणुका होणार का, निवडणुका होणार असतील तर कशा होणार हे महत्त्वाचं आहे. निवडणूक कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषय नाही. २०१७ च्या पत्रकार परिषदेत मी मविआ नेत्यांबरोबर होतो. विशेष म्हणजे त्यावेळी आमच्याबरोबर या मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवारही होते. आज त्यांनी देखील आमच्याबरोबर यायला हवं होतं. कारण ते त्यावेळी तावातावाने बोलत होते, मुद्दे मांडत होते.”
“…तर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा”, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांना टोला
महाविकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम व निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी सर्व नेत्यांनी मतदार याद्यांमधील घोळ निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्हाला निष्पक्षपणे, पारदर्शकपणे निवडणुका घ्यायच्या असतील तरच या निवडणुका घ्या अन्यथा तुम्ही इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा.”
“एकाच घरात २०० ते ४०० लोक राहात असल्याचं यादीत पाहायला मिळालं. या लोकांनी लोकशाहीचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की निष्पक्ष निवडणुका घ्यायच्या असतील तरच घ्या. नाहीतरी इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
इतके गोंधळलेले विरोधक मी आयुष्यात पाहिले नाहीत- मुख्यमंत्री फडणवीस
“इतके कन्फ्युज्ड विरोधक मी माझ्या आयुष्यात पाहिलेले नाहीत. इतके मोठमोठे लोकं त्यांना कुणाकडे गेलं पाहिजे? कायदा काय आहे हे माहीत आहे की नाही माहीत नाही. पण मला वाटतं की, त्यांना सगळं माहीत आहे. पण पर्सेप्शन क्रिएट करण्याठी म्हणजे निवडणुकीत हरलो तर आधीच पर्सेप्शन तयार करत आहेत. विरोधक निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांच्याकडे गेले होते. त्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं काहीच नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वेगळा कायदा आहे. दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात वेगळं कमिशन आहे. काल सगळे महाभाग चोकलिंगम यांना भेटले. यांना भेटल्यावर त्यांना कळलं की दिनेश वाघमारेंना भेटायचं होतं. मग काहीतरी थातूरमातूर उत्तरं दिली. दोन वेगळ्या बॉडीज आहेत. आता आज वाघमारे यांना भेटले. तिथे काय मागणी करायची हे देखील विरोधकांना समजलं नाही. राज्याचा जो निवडणूक आयोग आहे तो निवडणुका घेतो. मतदार याद्यांच्या संदर्भात ते जी यादी आहे ती अॅडॉप्ट करतात त्यावर हरकती, सुधारणांची संधी दिली जाते. जर यांच्याकडे पुरावे असतील तर त्या कालावधीत ते विरोधकांनी दिले पाहिजेत. हे काही करायचं नाही. फक्त नरेटिव्ह तयार करायचं काम विरोधक करत आहेत,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“…तर अजून सहा महिने निवडणुका घेऊ नका” – राज ठाकरे
आज विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. आणि मतदार याद्यांमधील घोटाळ्यांबद्दल माहिती दिली. या भेटीवेळी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार याद्या दुरूस्त होत नाहीत तोपर्यंत निवडणूक न घेण्याचे आवाहन आयोगाला केले. “मतदार यादीमधील घोळ सुधारत नाही तोवर निवडणूक घेऊ नका अशी विनंती आम्ही निवडणूक आयोगाला केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आपण या निवडणुकांसाठी पाच वर्षे थांबलो आहोत. तर या याद्या सुधारण्यासाठी आणखी सहा महिने गेले तरी काहीच हरकत नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला सुचवलं आहे की या याद्या सुधारल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका.”
“त्यांना जिंकण्याची खात्री नाही म्हणून…”; एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंना उत्तर
महायुतीच्या २३२ जागा निवडून आल्या तरी राज्यात सर्वत्र सन्नाटा होता, मतदार याद्या न दाखवणे हाच पहिला घोळ आहे, असे राज ठाकरे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले म्हणाले. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिले. एकनाथ शिंदे म्हणाले, “सन्नाटा कुठे, आमच्याकडे आहे की त्यांच्याकडे आहे? मी तर म्हणालो की सगळे लोक कन्फ्युज झाले आहेत. एवढे लोक एकत्र येतात तर त्यांच्या मनात विश्वास तयार झाला पाहिजे. जिंकण्याची खात्री पटली पाहिजे. आता निवडणुका पुढे ढकला म्हणजे त्यांना जिंकण्याची खात्री नाही आणि पराभवाची चाहूल त्यांना लागली आहे, म्हणून असे वक्तव्य करत आहेत.”