कोल्हापूर : नदीकाठावरील साखर कारखाने, उद्योगांनी सांडपाणी प्रक्रिया करून पाण्याची निर्गत करायची आहे. अशी प्रक्रिया न करणारे कारखाने बंद करण्यात येतील, असा इशारा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

कोल्हापूर शहरात घनकचरा, ओला -सुका वर्गीकरण होण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करा. तरीही कचऱ्याचे वर्गीकरण होत नसेल तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, असा सल्ला त्यांनी महापालिकाला दिला.

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आज प्राथमिक बैठक घेतली आहे. जिल्हाधिकारी, आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी अशी जिल्हास्तरावर संयुक्त बैठक घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. त्यासाठी पुनर्प्रक्रिया, पुनर्वापर यावर भर द्यावा, असा सल्ला सिद्धेश कदम यांनी दिला. डी. वाय पाटील समूहाच्यावतीने आयोजित पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि संधी या विषयावरील परिषदेत ते बोलत होते. समूहाचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या बाबी प्राधान्यक्रमाने करणे गरजेचे आहे, याची जाणीव करून दिली.