पाऊस नसल्याने चिंता व्यक्त करताना दुष्काळी भागात साखळी बंधा-यांचा चांगला लाभ झाल्याने राज्यभर ही योजना राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. महापालिका क्षेत्रात एलबीटी रद्द करून व्हॅटवर अधिभार लावण्याबाबत शासन गंभीर असल्याचे नमूद करताना, मुंबई महापालिकेनेही जकातीचा आग्रह सोडून शासनाच्या कायद्याचा अंमल स्वीकारावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
दिवंगत माजी केंद्रीयमंत्री आनंदराव चव्हाण व काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त मलकापूर येथे प्रेमलाकाकी चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाचा वर्धापनदिन, विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अशा कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी परिवहनमंत्री मधुकर चव्हाण होते. तर,ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कार्यक्रमाचे संयोजक मनोहर शिंदे, आमदार आनंदराव पाटील, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, रजनीताई पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले, की आई-वडिलांची शिकवण, प्रेरणा व संस्कारांमुळेच आज मी समाजकारणात इथपर्यंत पोहोचलो आहे. त्यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमांबद्दल मी समाधानी आहे. मलकापूर नगरपंचायत चांगले उपक्रम व योजना राबवणारे विकासाभिमुख शहर असून, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी उठावदार कामगिरी केली असल्याचे त्यांनी नमूद केले. यंदाच्या पुरवणी अर्थसंकल्पात मलकापूरच्या विकासकामांना साडेदहाकोटींचा निधी दिला असल्याचे सांगताना, लवकरच मलकापूरचा शहर विकास आराखडा मंजूर होवून प्रसिध्द होणार असल्याचे ते म्हणाले. अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड देत त्यासाठी देशाच्या इतिहासात सर्वाधिक मदत देण्याचे मोठे काम राज्यशासनाने गेल्या तीन वर्षांत केले आहे. आता, गाळमुक्त जलसिंचन प्रकल्प व टँकरमुक्त दुष्काळभाागासाठी प्रयत्नशील राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वायत्तता अबाधित ठेवली जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. महाराष्ट्र विकासात अव्वल असून, गुजरातपेक्षा निश्चितच राज्याची स्थिती समाधानकारक असल्याचा दावा करताना, समृध्द महाराष्ट्राचा कोपराही विकासाच्या प्रवाहात आला पाहिजे, समांतर विकास साधला जाताना प्रत्येक व्यक्तीचे जीवनमान उंचावले पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.
अनंत दीक्षित म्हणाले, की मनोहर शिंदेंसारखे कार्यकर्ते सर्वत्र असते तर काँग्रेसला पराभवावर चिंतन करण्याची वेळ आली नसती. पूर्वी काँग्रेसला वाहून घेणारे पुढारी होते. आता पाहून घेणारे पुढारी असल्याचे ते म्हणाले.
मधुकर चव्हाण म्हणाले, की पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात नैसर्गिक संकटांबरोबरच राजकीय संकटेही ओढवली. मात्र, पृथ्वीराजबाबा अभ्यासू असल्याने हिताचे निर्णय झाले.