मुंबई : राज्य शासनाच्या सेवेतील सरळसेवेच्या कोटय़ातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्रे सादर करणे आवश्यक आहे, अशा सूचना सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कक्षेतील सरळसेवेची पदे भरण्यासाठीची कार्यपद्धती ठरविण्यात आली होती. ही पदे भरण्यासाठी लोकसेवा आयोगाला विहित कालावधीत मागणीपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु दर वर्षी मागणीपत्रे पाठविली जात नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. मागणीपत्रे पाठविली जात नसल्यामुळे पदे दीर्घकाळ रिक्त राहून, त्याचा प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे या पुढे सरळसेवेच्या रिक्त पदांच्या भरतीची मागणीपत्रे प्रतिवर्षी सप्टेंबर महिन्यात म्हणजे पदोन्नत्तीच्या निवडसूचीच्या वर्षांच्या सुरुवातीस एमपीएससीला सादर करावीत, अशा सूचना राज्य शासनाने सर्व प्रशासकीय विभागांना दिल्या आहेत.

राज्य शासनाच्या सेवेतील सरळसेवेची पदे भरण्यासंदर्भात लोकसेवा आयोगाला सादर करावयाच्या मागणीपत्रांबाबतची सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. सप्टेंबर ते ऑगस्ट या कालावधीत रिक्त पदांची गणना करणे, तसेच सरळसेवेच्या कोटय़ातील रिक्त पदांची संख्या निश्चित करून, त्यानुसार एमपीएससीला मागणीपत्रे सादर करायची आहेत. सेवानिवृत्ती आणि पदोन्नत्तीमुळे रिक्त होणारी पदेही विचारात घेणे आवश्यक आहे. सामाजिक व समांतर आरक्षण निश्चित करुन पदभरतीची मागणी पत्रे सादर करावयाची आहेत.

एमपीएससीला नोकरभरतीच्या सूचना : अजित पवार 

एमपीएससीला जेवढय़ा जागांची माहिती प्राप्त झाली आहे, त्यानुसार नोकरभरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिली. दर आठवडय़ाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमपीएसीमार्फत भरावयाच्या रिक्त जागांचा आढावा घेतला जातो. काही विभागांची रिक्त जागांची माहिती आली नव्हती. मात्र जेवढय़ा जागांची माहिती मिळाली आहे, त्यानुसार भरती करण्याच्या एमपीएससीला सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.