राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवी मंदिरात आणि राजगड किल्ल्यावर जाण्याऱ्या भक्तासांठी आता पायी जावं लागणार नाही. लोणावळ्याजवळील कार्ला येथील श्री एकविरा देवी मंदिरात आणि पुण्यातील राजगड किल्ल्यावर फ्युनिक्युलर रेल्वे किंवा रोप वे तयार करण्यासाठी राज्य पर्यटन विभाग आणि इंडियन पोर्ट रेल आणि रोप वे कॉर्पोरेशन लिमिटेड (आयपीआरसीएल) यांनी शुक्रवारी सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता काही मिनिटांमध्ये भाविकांना येथे जाता येणार आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या करारावर सह्या करण्यात आल्या. रोप वे मार्गाच्या निर्मितीसाठी आर्थिक आणि तांत्रिक सोयींसाठी अहवाल तयार करणे, निविदा प्रक्रिया राबवणे यासाठी राज्य पर्यटन विभाग आणि इंडियन पोर्ट रेल आणि रोप वे कॉर्पोरेशन लिमिटेड (आयपीआरसीएल)मध्ये हा करार करण्यात आला आहे. महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळातर्फे कृषी-पर्यटनाला चालना देण्यासाठी हा करार करण्यात आला. हा प्रकल्प ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ (बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर मॉडेल) या तत्त्वावर सुरु करण्यात येणार आहे.
एकविरा मंदिरात भाविकांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंग फज्जा
एकविरा देवी मंदिर ठाकरे कुटुंबियांचे कुलदैवत
“लोकप्रिय तीर्थक्षेत्र असल्याने आणि जवळ कार्ला लेणी पर्यटन स्थळ असल्यामुळे येथे या प्रकल्पाची निर्मिती करण्यात येत आहे. एकवीरा देवी मंदिरात दरवर्षी ७ ते ८ लाख भाविक येतात. त्याचप्रमाणे, राजगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे आणि हे एक लोकप्रिय ट्रेकिंग ठिकाण आहे. रोप वेमुळे हे धार्मिक स्थळावर भाविकांना सहज पोहोचता येणार आहे व परिणामी पर्यटनाला चालना मिळेल” पर्यटन संचालनालय संचालक डॉ. धनंजय सावळकर म्हणाले.
“रोप वे प्रकल्पासाठी कमी जमीनीचे अधिग्रहण करावे लागणार आहे. त्यामुळे तो उपयोगी आणि पर्यावरणपूरक आहे. हे महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रासाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे,” असे आयपीआरसीएलचे संचालक अनिल कुमार गुप्ता म्हणाले.