Maharashtra Political News: आज राज्यात रोहित आर्य, शेतकरी कर्जमाफी आणि संजय राऊत यांनी आजारपणाबाबत केलेली पोस्ट आणि त्यावर पंतप्रधान मोदी यांनी दिलेली प्रतिक्रिया राज्यभरात चर्चेत आहे. या बातमीच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी रोहित आर्य प्रकरणावर व्यक्त केलेली प्रतिक्रिया, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला लिहिलेले पत्र, संजय राऊत यांची पोस्ट आणि त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचा आढावा घेणार आहोत.

“…तर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असती”; रोहित आर्य प्रकरणावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

मुंबईच्या पवईमधील एका फिल्म स्टुडिओत गुरुवारी दुपारी रोहित आर्य नामक एका व्यक्तीने १७ मुलांसह दोघांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. मात्र, या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या ३५ मिनिटांत पीडितांची सुटका केली. पण यावेळी झालेल्या चकमकीत रोहित आर्य याचा मृत्यू झाला.

यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “महाराष्ट्रात नवीन ट्रेंड येत आहे, तो महाराष्ट्राच्या हिताचा नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमची विनंती आहे की यातून मार्ग काढला पाहिजे. कारण भारतातील सर्व राज्यातील पोलिसांपेक्षा महाराष्ट्राचे पोलीस हे सर्वात चांगले आहेत. महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मग अशी परिस्थिती असताना पोलीस खात्यात असे काय बदललेय की सातत्याने केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे.”

रोहित आर्य प्रकरणी आरोप; दीपक केसरकरांनी दिले प्रत्युत्तर

रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने मुंबईतील पवई येथे काल १७ अल्पवयीन मुलांना ऑडिशनसाठी बोलवून एका स्टुडिओमध्ये ओलीस ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. अखेर पोलिसांनी स्वच्छतागृहातून प्रवेश करून १७ मुलांसह एकूण १९ जणांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अपहरणकर्ता रोहित आर्य याचा मृत्यू झाला.

या प्रकरणामध्ये माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर आरोप होत आहेत. या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही शालेय शिक्षणमंत्री असताना रोहित आर्यला एक कंत्राट मिळाले होते आणि त्याचे पैसे बाकी होते म्हणून कालची घटना घडली असे म्हटले जात आहे असा प्रश्न केसरकरांना विचारण्यात आला.

याबाबत एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना केसरकर म्हणाले की, “शासनाकडे कोणाचेही पैसे शिल्लक राहात नाहीत. त्यांच्या बाबतीत असे झाले होते की, त्यांनी एक वेबसाइट तयार केली होती आण त्यावरून मुलांकडून पैसे स्वीकारले होते. त्यामुळे विभागाचे म्हणणे होते की त्यांनी हे पैसे परत करावेत आणि असा प्रकार पुन्हा घडणार नाही असे त्यांच्याकडून लिहून घ्यावे. पण पुढे काय झाले हे मला माहित नाही कारण मी पुढे शिक्षणमंत्री राहिलो नाही, पण त्यांनी जर त्याची पूर्तता केली असती तर त्यांचे बिल मिळण्यास कुठलीही अडचण असू नये असे मला वाटते.”

“शेतकऱ्यांना न झुलवता कर्जमुक्त करा”, उद्धव ठाकरे आक्रमक

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्यासह काही शेतकरी नेत्यांनी नागपूरमध्ये मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या पार्श्वभूमीवर एक समिती स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आता माजी मख्यमंत्री उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला एक पत्र लिहित ‘शेतकऱ्यांना न झुलवता कर्जमुक्त करा’, अशी मागणी केली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले की, “शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा!, कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी खचला आहे. निसर्ग कोपलाच आहे. त्यात संवेदना नसलेल्या सरकारचा तुघलकी कारभार, अशा अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने लोणकढी थाप मारून वेळ काढायचा प्रयत्न केला आहे.”

“माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड”, संजय राऊत यांची पोस्ट चर्चेत

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. सर्व राजकीय पक्षांकडून या निवडणुकीची तयारी केली जात आहे. यादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची भक्कमपणे बाजू मांडणारे नेते संजय राऊत यांच्याबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. संजय राऊतां नी स्वतः सोशल मीडियावर एका पत्राच्या माध्यमातून ते आजारी असल्याची माहिती दिली आहे.

एक्सवर शेअर केलेल्या पत्रात खासदार संजय राऊत म्हणाले की, “आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले. पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. “वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन.”

“तुमच्या प्रकृतीत…”, पंतप्रधान मोदींची संजय राऊत यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यसभा खासदार संजय राऊत सध्या एका आजाराने ग्रस्त झाले असून उपचारासाठी ते दोन महिने विश्रांती घेणार आहेत. याची घोषणा त्यांनी स्वतःहून सोशल मीडियावर केली होती. त्यांचे पत्र शेअर करत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांच्या पत्राची पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर शेअर केली आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले, “संजय राऊतजी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो.”