Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Result
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या अनेक मतदारसंघामधील प्राथमिक कल हाती आले आहेत. विशेष म्हणजे लोकसभेची पोटनिवडणुक असणाऱ्या सातारा मतदारसंघामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे कल हाती आले असून त्यानुसार उदयनराजे पिछाडीवर असून श्रीनिवास पाटील आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीनंतर उदयनराजे भोसले १० हजार मतांनी पिछाडीवर आहेत. याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पावसामध्ये घेतलेली सभा पुन्हा चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे केवळ साताराच नाही तर जेथे जेथे या सभेच्या दुसऱ्या दिवशी उमेदवारांनी पावसात भिजून प्रचार केला तेथील उमेदवार प्राथमिक कलांमध्ये आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९ ऑक्टोबर रोजी शरद पवारांची साताऱ्यामध्ये सभा झाली. या सभेमध्ये अचानक पाऊस पडू लागला. मात्र पवारांनी आपले भाषण सुरुच ठेवले. जवळजवळ पाच मिनिटे ते भर पावसामध्ये शरद पवार यांनी भाषण दिले. पवारांचा भर पावसात भाषण देतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले. शनिवारी सकाळपासूनच #SharadPawar हा हॅशटॅग ट्विटवर पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड होताना दिसला. देशभरातील अनेक नेटकऱ्यांनी ट्विटवरुन पावसात उभ राहून भाषण देण्याच्या पवारांच्या या राजकारणावरील आणि आपल्या कामावरील निष्ठेला सलाम केल्याचे पहायला मिळाले. याच सभेमुळे वातावरण फिरलयं आमचं ठरलंय असं म्हणत राष्ट्रवादीची जागा लागणार अशी चर्चा सुरु झाली. याचेच चित्र प्राथमिक कल दाखवत असल्याचे सध्या दिसत आहे.

शरद पवारांच्या यासभेनंतर शनिवारी झालेल्या प्रचारामध्ये वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांनी पावसात प्रचार केला. आदित्य हेही वरळीमध्ये प्राथमिक कलांमध्ये ११ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तसेच आशिष शेलार हे वांदे पश्चिम मतदारसंघामधून निवडणूक लढवत असून त्यांनी पावसामध्ये प्रचार केला. शेलारही आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. याशिवाय अजित पवार यांनाही पावसामध्ये सभा घेतली होती. अजित पवार हे बारामतीमधून आघाडीवर आहेत. कर्जत आणि जामखेड या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आणि जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्याविरोधात रोहित पवार निवडणूक लढवत आहेत. सध्या रोहित पवार हे आघाडीवर असल्याचे चित्र असले तरी येथील निवडणूक चुरसीची दिसत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2019 result candidate rain rally scsg
First published on: 24-10-2019 at 10:43 IST