विधानसभा निवडणुकीत मनसेला अवघ्या एका जागेवर यश मिळाले आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे प्रमोद पाटील विजयी झाले आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे रमेश म्हात्रे आणि प्रमोद पाटील यांच्यात अत्यंत अटी-तटीची लढाई झाली. या विजयानंतर मनसेने ट्विट करुन प्रमोट पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
प्रत्येक फेरीमध्ये चढ-उतार सुरु होते. अखेर पाच हजार मतांच्या फरकाने प्रमोद पाटील विजयी झाले आहेत. या एकमेव जागेचा अपवाद वगळता संपूर्ण राज्यात मनसेला कुठेही यश मिळालेले नाही. प्रमोद पाटील यांच्या विजयानंतर मनसेने केलेल्या ट्विटमध्ये “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. प्रमोद उर्फ राजू पाटील विजयी झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन,” असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटबरोबर प्रमोद पाटील यांचा राज ठाकरेंबरोबरचा फोटोही पोस्ट करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. प्रमोद उर्फ राजू पाटील ( @rajupatilmanase ) विजयी झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन pic.twitter.com/Dn0Cl02eWm
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 24, 2019
कल्याणबरोबरच डोंबिवलीमध्ये मनसेचे मंदार हळबे यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती. पण नंतर ते पिछाडीवर पडले आणि तेथून अखेर भाजपाचे रविंद्र चव्हाण विजयी झाले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही मनसेने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही मनसेला जुन्नरच्या फक्त एका जागेवर शरद सोनावणे यांना मनसेच्या तिकीटावर लढून विजय मिळाला होता. पण त्यानंतर सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. २००९ मध्ये मनसेचे सर्वाधिक १३ आमदार निवडून आले होते.