Devendra Fadnavis Slams Rahul Gandhi: रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महिला भाजपाने मुंबईत ‘आपला भाऊ, देवा भाऊ’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी राज्यभरातील महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाखो राख्या पाठवल्या होत्या. दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महिलांमुळेच आपण सत्तेत असल्याचे आणि महिलांनी भरभरून मते दिल्याचे म्हटले आहे.

याचबरोबर, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी करत असलेल्या मतचोरीच्या आरोपांवरही त्यांनी टीका केली. फडणवीस यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता म्हटले की, “ते आधी परदेशात जाऊन भारताची बदनामी करायचे, आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करत आहेत.”

तुमच्या आशीर्वादामुळेच…

या कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, “महिलांसाठी आपण अनेक वेगवेगळ्या योजना सुरू केल्या. काही लोक म्हणायचे की या योजना निवडणुकीपूर्वीच आहेत आणि निवडणूक संपल्यानंतर या योजना बंद होतील. निवडणूक होऊन अनेक महिने झाले, तरीही या योजना अजूनही सुरूच आहेत. यातील एकही योजना पुढील पाच वर्षांत आम्ही बंद होऊ देणार नाही. तुमच्या आशीर्वादामुळेच आम्हाला यश मिळाले.”

यांना अक्कल यावी यासाठी…

ते पुढे म्हणाले की, “या यशामुळे तुम्ही आनंदी आहात, पण काही जणांचे अजूनही समाधान झालेले नाही. हे रोज मतचोरी झाल्याचे म्हणतात. मतचोरी नाही, तर यांचेच डोके चोरीला गेले आहे. बहिणींना विनंती आहे की, यांना अक्कल यावी यासाठी त्यांच्यासाठीही आशीर्वाद मागा. आमच्या लाडक्या बहिणींच्या मतांना जर हे चोरी म्हणत असतील, तर यांच्यापेक्षा मोठे चोर कोण असतील?”

बिराहमध्ये महाराष्ट्राची बदनामी

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा आरोप केला होता. यावर नाव न घेता टीका करताना फडणवीस म्हणाले, “कालपर्यंत हे परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होते. आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. पण यांना ना परदेशात कोणी विचारले, ना बिहारमध्ये कोणी विचारेल. जी परिस्थिती यांची महाराष्ट्रात झाली, तीच परिस्थिती बिहारमध्ये होणार आहे.”

राहुल गांधींची बिहारमध्ये यात्रा

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने देशभरात निवडणुकांमध्ये गैरप्रकार केले असून या ‘मतचोरां’ना केंद्र आणि बिहारच्या सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह ‘महागठबंधन’च्या नेत्यांनी ‘व्होटर अधिकार यात्रे’ला सुरुवात केली आहे. या यात्रेत राहुल गांधी सातत्याने महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचे म्हणत आहेत.