“माझ्या अंगाला विजयाचा गुलाल लागावा, अशी अण्णाची इच्छा होती. त्यांना माझ्या अंगाला गुलाल लागलेलं बघायचं होतं. आज ते हवे होते. आज माझ्या अंगाला लागलेला गुलाल त्यांना सांगता येत नाही,” अशी भावनिक प्रतिक्रिया होती राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची.

विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची लढत होती परळीत. डीएम विरूद्ध पीएम अर्थात धनंंजय मुंडे आणि पंकजा मुंडे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारलेल्या पंकजा मुंडे यांच्यासमोर धनंजय मुंडे यांनी तगड आव्हान उभं केलं होतं. धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात केलेल्या कामामुळे त्यांचं पारडं जड होतं. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी जोर लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक सभा घेत गुलाल उधळण्याची तयारी सुरू केली होती.

मतदानाच्या दिवसांपर्यंत हा मतदारसंघ राज्यात चर्चेत राहिला. मतदानाच्या अखेरच्या दिवशी धनंजय मुंडे यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ, भाषणानंतर कोसळलेल्या पंकजा मुंडे, त्यानंतर दोघांचीही भावूक साद घालणारी पत्रकार परिषद यामुळे निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

राज्यातील अत्यंत प्रतिष्ठेची चुरशी लढत ठरलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी ३० हजार मतांनी विजय संपादन केला. नंजय मुंडे यांना १ लाख २२ हजार ११४ मते मिळाली, तर भाजपच्या पंकजा मुंडे यांना ९१ हजार ४१३ मते मिळाली.

विजयानंतर बोलताना धनंजय मुंडे भावनिक झाले. वडील पंडितअण्णा मुंडे यांची आठवण काढत ते म्हणाले, “अण्णांना माझ्या अंगाला गुलाल लागलेला बघायचा होता. पण, आज माझ्या अंगाला लागलेला गुलाल बघायला ते नाहीत, असं ते म्हणाले. पंकजा मुंडे यांच्या पराभवाविषयी बोलताना ते म्हणाले, “एकीकडं या विजयाचा आनंदही आहे आणि दुसरीकडं खंतही आहे. कारण ते (पंकजा मुंडे) मानत नसलं तरी शेवटी आमचं रक्ताचं नातं आहे. शेवटी कुटुंबातील व्यक्तीचा हा पराभव आहे. त्यामुळे मनात खंत आहेच,” असं सांगताना धनंजय मुंडेंच्या डोळ्यात पाणी तरळले.