विधानसभा निवडणूक एकतर्फी होणार आणि भाजपा-शिवसेना युतीचं सरकार सत्तेवर येणार अशी चर्चा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी सुरू होती. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढत भाजपासमोर कडवं आव्हान निर्माण केलं होतं. शरद पवारांनी आक्रमक्र पवित्रा घेतल्याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून आला आहे.

शरद पवार, अजित पवारांसह विरोधी पक्षातील सर्वच महत्त्वाच्या नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न भाजपानं केला होता. यात काही अंशी यश आल्याचं प्रचारात दिसून आले होते. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात भाजपाची खेळी सपशेल अपयशी ठरली आहे. बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या अजित पवारांसमोर भाजपानं धनगर समाजातील मते विचारात घेऊन गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे पडळकर काय चमत्कार करतात याकडं सर्वांच लक्ष होतं.

विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरूवारी जाहीर झाले. पहिल्या फेरीपासून अजित पवार यांनी आघाडी घेत पडळकर निष्प्रभ करून टाकल्याचं चित्र होतं. त्यामुळे पवार जिंकणार हे सुरूवातीच्या काही फेरीनंतर स्पष्ट झालं होतं. मात्र, अजित पवार यांनी पडळकर यांचा पराभव करत भाजपाला जबर धक्का दिला आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचा फक्त पराभवच केला नाही, तर डिपॉझिटही जप्त केलं आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्याविरोधात रिंगणात उतरलेल्या सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांनी राज्यभर राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या होत्या. राज्यातील प्रचाराच्या समारोपाची शेवटची सभा बारामतीत घेतली होती. तर दुसरीकडे भाजपाचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही विशेष लक्ष दिलं होतं. लोकसभा निवडणुकीतही भाजपाकडून शरद पवार यांना घेरण्याचा प्रयत्न झाला होता. त्या निवडणुकीतही सुप्रिया सुळे यांनी दणदणीत विजय संपादित केला होता.