‘पेटंट’ मिळण्याचा मार्ग मोकळा पोटातील विकारावर गुणकारी ठरल्याचा दावा
महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेद्वारा(एमगिरी) विकसित जैविक मधाची रुग्णांवर केलेली चाचणी यशस्वी ठरली असून पोटातील विकारावर गुणकारी ठरणाऱ्या या मधाचे ‘पेटंट’ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नैसर्गिक मध हाच मुळात अत्यंत गुणकारी समजला जातो. त्यावर जैविक प्रक्रिया केल्यानंतर त्याची प्रभाव क्षमता कितीतरी पटीने वाढल्याचे वैद्यकीय चाचणीतून सिद्ध झाले आहे. येथील ‘एमगिरी’तर्फे हा ‘प्रो-बायोटिक हनी’ विकसित करण्यात आला आहे. ग्रामोद्योगी उपक्रमात नावीन्यपूर्ण उत्पादनाचे संशोधन करणाऱ्या या संस्थेच्या तीन वैज्ञानिकांनी हा जैविक मध तयार करण्यात यश प्राप्त केले.
नैसर्गिक मधात ‘लॅक्टो-बॉयसोलस’ या जीवाणूंची सरमिसळ करण्यात येऊन ही निर्मिती झाली. तब्बल अडीच वषार्ंच्या संशोधनाअंती हे शक्य झाले आहे. जैविक मध अपायकारक नसल्याचे एका प्रयोगशाळेत उंदरावर प्रयोग करीत सिद्ध झाल्यावर ‘एमगिरी’ने त्याची रुग्णावर तपासणी करण्यासाठी विविध वैद्यकीय संस्थांना आवाहन केले होते. कमी शुल्कात अशी तपासणी करून देण्यास पात्र ठरलेल्या सावंगी येथील मेघे अभिमत विद्यापीठाच्या संशोधन विभागाने जैविक मधाची चाचणी सुरू केली. २५ रुग्णांच्या तीन गटात तपासणी झाली. अॅन्टी बायोटिक्स, जैविक मध व साधा मध अशा तीन प्रकारे पोटाच्या विकाराच्या रुग्णांवर चाचण्या करण्यात आल्या. अॅन्टी बायोटिक्स घेणारे रुग्ण तंदुरुस्त होतात. पण शारीरिक थकव्याचाही दुष्परिणाम होतो. साध्या मधाच्या उपचारास विलंब लागतो. तर जैविक मधाने रुग्ण विनातक्रार कमी वेळात बरा होत असल्याचे निदर्शनास आल्याचे रुग्णालयाच्या डॉ. प्रिती देसाई यांनी नमूद केले. चयापचय प्रक्रिया सुधारते. विशेष म्हणजे सर्व वयोगटातील डायरियाच्या रुग्णांसाठी हा मध पोषक ठरत आहे. पारंपरिक औषधोपचारापेक्षा आतडय़ाची कार्यक्षमता वाढविण्यास हा मध गुणकारी ठरत असल्याचे दिसून आले, अशी पुष्टी त्यांनी केली.
त्यांना डॉ. जयंत वाघ व डॉ. मनीष देशमुख यांनी चाचण्यांसाठी सहकार्य केले. ‘एमगिरी’चे संचालक डॉ. प्रफु ल्लकुमार काळे म्हणाले, पेटंटसाठी आम्ही हा मध दिल्लीला पाठविला असून तो सध्या विचारार्थ श्रेणीत आहे. पोटात गेल्यावर वितळणारा हा जैविक मध एकही वाईट परिणाम करीत नाही. सोयामिल्कमध्ये चमचाभर हा मध मिसळल्यावर गोड दही तयार होते. विरजण म्हणून हा एक चांगला फोयदा दिसून आल्याचे ‘प्रो-बायोटिक’ मधाचे सूत्रधार संशोधक डॉ.आर.के. यादव यांनी नमूद केले. त्यांच्यासह डॉ. अपराजिता व डॉ. जयकिशोर छांगाणी यांनी मिळून या गुणकारी मधाची निर्मिती केली आहे. नैसर्गिक मधापेक्षा हा औषधी गुणधर्माचा मध किमतीने दुप्पट पडेल. पण, उपयोग अधिकपटीचा राहणार. यासोबतच ‘ब्लू हनी’ संशोधनाच्या अंतिम टप्प्यावर असल्याचे डॉ. काळे म्हणाले. पोटावरील विकारावर तसेच विकार नसतांनाही आतडे सक्षम करण्यासाठी हा मध लाभदायी उपाय असल्याचा दावा संशोधक चमूने केला आहे.