मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये सुरू असलेली महाविकास आघाडीची बैठक संपली आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जिंकून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत विचारलं असता उद्धव ठाकरेंनी थेट बोलणं टाळलं आहे. बैठकीत संबोधित करण्यासारखं काही असतं तर तुम्हालाच आत बोलावलं असतं, असं त्यांनी पत्रकारांना म्हटलं आहे.

या बैठकीनंतर महाविकास आघाडीमधील इतर नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, या बैठकीत वेगळं काही बोललं गेलं नाही. महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ असल्यानं आपले चारही उमेदवार निवडून येणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच सत्तापिपासू लोकांना आपल्याला सत्तेपासून दूर ठेवायचं आहे. सर्व उमेदवार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी आपलं ऐक्य दाखवा, असं मुख्यमंत्री बैठकीत म्हणाल्याची माहिती अभिजीत वंजारी यांनी दिली आहे.

खरंतर, महाराष्ट्रात तब्बल दोन दशकांनंतर राज्यसभा निवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे नवीन आमदारांना संबंधित निवडणूक कशी असते, याच्या तांत्रिक बाबी समजावून सांगण्यासाठी कार्यशाळा घेतली जाईल किंवा मार्गदर्शन केलं जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अशाप्रकारची कोणतीही कार्यशाळा बैठकीत झाली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बैठकीत १२ अपक्ष आमदारांसह काँग्रेसचे ३२, शिवसेनेचे ४५, राष्ट्रवादीचे ४२ आमदार उपस्थित होते. त्यामुळे महाविकास आघाडीचं पारडं जड झालं आहे. तर सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या चारही उमेदवारांना निवडून आणा, ऐक्य दाखवा आणि मतदान करताना काळजी घ्या, असं शरद पवारांनी बैठकीत आमदारांना सांगितलं आहे.