अलिबाग : अलिबाग नगरपालिका निवडणूकीसाठी महायुतीचा नगराध्‍यक्ष पदाच्‍या उमेदवाराचा शोध संपला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्‍या माजी नगरसेविका तनुजा पेरेकर यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला असून त्‍यांना अलिबागच्‍या नगराध्‍यक्षपदाची उमेदवारी देण्‍यात आली आहे.भाजपचे रायगड जिल्‍हाध्‍यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनी भाजपच्‍या अलिबाग कार्यालयात तनुजा पेरेकर यांच्‍या उमेदवारीची घोषणा केली. यावेळी निवडणूक प्रमुख सतीश धारप, जिल्‍हा सरचिटणीस अॅड. महेश मोहिते, शोभा जोशी, अलिबाग शहरप्रमुख अॅड. अंकित बंगेरा, अॅड. आस्‍वाद पाटील उपस्थित होते.

अलिबाग नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष , शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी एकत्र येत महायुतीची घोषणा केली आहे. या युतीकडून नगराध्यक्ष पदासाठी तनुजा पेरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून महायुतीचा नगराध्‍यक्षपदाच्‍या उमेदवाराचा शोध सुरू होता. त्‍यासाठी अनेक नावे चर्चेत होती. मात्र शेकापकडून अक्षया नाईक यांचे नाव नगराध्‍यक्षपदासाठी निश्चित झाल्‍यानंतर इच्‍छुकांनी रिंगणातून माघार घेतली. त्‍यानंतर कुणाला उमेदवारी द्यायची असा पेच महायुतीसमोर होता. त्‍यातच नाराज असलेल्‍या ठाकरे गटाच्‍या तनुजा पेरेकर महायुतीच्‍या गळाला लागल्‍या.

तनुजा पेरेकर या शिवसेना ठाकरे गटाच्‍या माजी नगरसेविका आहेत. यावेळी देखील त्‍या इच्‍छुक होत्‍या परंतु शेकापने महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला एकही जागा न सोडल्‍याने नाराज होवून त्‍यांनी महायुतीकडून नगराध्‍यक्ष पदाची उमेदवारी मिळवली. सोमवारी त्‍यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यात येणार आहे.