दापोली : महाराष्ट्रात होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिला महायुतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज खेड येथे दाखल करण्यात आला. शिवसेना पक्षाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. माधवी राजेश बुटाला यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.
यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, शिवसेना उपनेते संजयराव कदम, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजप शहराध्यक्ष अनिकेत कानडे, तालुकाध्यक्ष ऋषीकेश मोरे तसेच चिपळूणचे माजी आमदार रवींद्र चव्हाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी युतीच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर वाजतगाजत शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील नागरिकांनी या मिरवणुकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहाने प्रतिसाद दिला.
ढोलताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीच्या वातावरणात मिरवणुकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. खेड नगरपरिषद येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे महायुतीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेल्या नागरिकांची उपस्थिती पाहून महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
