Mahayuti Government Report Card : महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या सर्व विभागांसाठी एक १०० दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला होता. या १०० दिवसांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक योजना, विकासाची कामे, अनेक प्रकल्प मार्गी लावण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची संकल्पना मांडली होती. आता या १०० दिवसांच्या कामांचा अहवाल राज्य सरकारने सादर केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर (ट्विटर) या संदर्भातील माहिती शेअर केली आहे. यामध्ये कोणत्या विभागाला १०० पैकी किती गुण पडले? याची देखील माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना सूचना दिल्या होत्या की, १ मेपर्यंत नियोजित केलेली कामे पूर्ण करावीत, तसेच प्रत्येक विभागाने १०० दिवसांच्या कार्यक्रमाची माहिती आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागल्याचंही पाहायला मिळालं.

आता राज्य सरकारच्या या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचं अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेनं जारी केलं आहे. यामध्ये गेल्या १०० दिवसांत किती टक्के कामे पूर्ण झाले आहेत? यासह कोणत्या विभागाचे किती टक्के कामे झाले? कोणत्या विभागाने बाजी मारली? याची आकडेवारी देखील देण्यात आली आहे.

उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी कोण? कोणत्या विभागाने बाजी मारली?

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर (ट्विटर) या संदर्भातील माहिती दिली आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचं भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आलं आहे.

या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये ५ मंत्रालयीन विभागांचे सचिव, ५ मंत्रालयीन विभागांचे आयुक्त,⁠ ५ जिल्हाधिकारी, ५ पोलीस अधीक्षक, ५ मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), ⁠४ महापालिका आयुक्त, ३ पोलीस आयुक्त, २ विभागीय आयुक्त आणि २ पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हटलं आहे की, “यांची नावे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो.”

सर्वोत्तम कामगिरी करणारे विभाग कोणते?

महिला व बाल विकास विभाग : ८० टक्के
सार्वजनिक बांधकाम विभाग : ७७.९५ टक्के
कृषी विभाग : ६६.१५ टक्के
ग्राम विकास विभाग : ६३.८५ टक्के
परिवहन व बंदरे विभाग : ६१.२८ टक्के

सर्वोत्तम जिल्हाधिकारी कोणते?

जिल्हाधिकारी, चंद्रपूर : ८४.२९
जिल्हाधिकारी, कोल्हापूर : ८१.१४
जिल्हाधिकारी, जळगाव : ८०.८६
जिल्हाधिकारी, अकोला : ७८.८६
जिल्हाधिकारी, नांदेड : ६६.८६

सर्वोत्तम आयुक्त तथा संचालक कोणते?

संचालक, तंत्र शिक्षण : ७७.४३
आयुक्त जमावबंदी : ७२.८६
आयुक्त आदिवासी विकास : ७२.५७
मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण जीवनोन्नती अभियान :७०.१८
आयुक्त, वैद्याकीय शिक्षण : ६९.४३

सर्वोत्तम पोलीस अधीक्षक कोणते?

पोलीस अधीक्षक, पालघर : ९०.२९
पोलीस अधीक्षक, गडचिरोली : ८०.००
पोलीस अधीक्षक, नागपूर (ग्रामीण): ८०.००
पोलीस अधीक्षक, जळगाव : ६५.७१
पोलीस अधीक्षक, सोलापूर (ग्रामीण): ६४.००

सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्यधिकारी कोणते?

जिल्हा परिषद मुख्य कार्याकारी अधिकारी, पुणे : ९२.००
जिल्हा परिषद मुख्य कार्याकारी अधिकारी, नागपूर : ७९.४३
जिल्हा परिषद मुख्य कार्याकारी अधिकारी, नाशिक : ७५.४३
जिल्हा परिषद मुख्य कार्याकारी अधिकारी, पुणे :७५.४३
जिल्हा परिषद मुख्य कार्याकारी अधिकारी, वाशिम : ७२.००

सर्वोत्तम पोलीस आयुक्त कोणते?

पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर : ८४.५७
पोलीस आयुक्त ठाणे, : ७६.५७
पोलीस आयुक्त मुंबई, रेल्वे : ७३.१४

सर्वोत्तम महापालिका आयुक्त कोणते?

महापालिका आयुक्त, उल्हासनगर : ८६.२९
महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड : ८५.७१
महापालिका आयुक्त, पनवेल : ७९.४३
महापालिका आयुक्त, नवी मुंबई : ७९.४३

सर्वोत्तम विभागीय आयुक्त कोणते?

विभागीय आयुक्त, कोकण : ७५.४३
विभागीय आयुक्त, नाशिक : ६२.२९
विभागीय आयुक्त, नागपूर : ६२.२९