रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील चिखलगावची मैत्रेयी राजाराम दांडेकर (२२) शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन वूमन (नॉन टेक्निकल) अंतर्गत महिला लष्करी अधिकारी म्हणून प्रशिक्षणासाठी पात्र ठरली आहे. लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सीडीएस परीक्षेत ती राष्ट्रीय गुणवत्ता यादीत ३३व्या क्रमांकावर झळकली. मैत्रेयी ही पुण्याच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेची विद्यार्थिनी आहे.
बालपणापासून लष्करी सेवेत जाण्याची प्रबळ इच्छा बाळगणारी मैत्रेयी वयाच्या दहाव्या वर्षी दापोलीहून पुण्यात दाखल झाली आणि राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत प्रवेश घेतला. दहावीला ८१.७३ तर बारावीला ७५.१७ टक्के गुण मिळवून मैत्रेयीने पदवीचे शिक्षण फग्र्युसन महाविद्यालयात प्राणिशास्त्र विषय घेऊन पूर्ण केले. शालेय व महाविद्यालयीन जीवनात ती कबड्डी, खो-खो, धावणे, उंच उडी, गिर्यारोहण या खेळांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाली. एन्डय़ुरो- ३ या साहसी शर्यतीत खुला-संमिश्र गटात तिच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत ती सर्वात लहान खेळाडू होती. एवढेच नव्हे तर, कात्रज ते सिंहगड या ‘केटूएस रात्र साहस’ शर्यतीत मुलींमध्ये तिने प्रथम क्रमांक मिळविला.
मैत्रेयीला कोणतीही लष्करी पाश्र्वभूमी नाही. तिचे वडील हे चिखलगाव येथे शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ही स्वयंसेवी संस्था चालवितात. तिची आई रेणू दांडेकर या लोकमान्य टिळक विद्यामंदिरात मुख्याध्यापिका आहेत. भाऊ कैवल्य हा वकिली करतो, तर वहिनी धनश्री समुपदेशक आहेत. खुद्द मैत्रेयीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मार्गदर्शक लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर आणि शाळेतील शिक्षकांना दिले. सैनिकी शाळेतच पाया मजबूत झाला. शिक्षक व मार्गदर्शकांच्या प्रोत्साहनामुळे हा पल्ला दृष्टिपथास आल्याचे मैत्रेयीने नमूद केले. फेब्रुवारी २०१२मध्ये लोकसेवा आयोगाने घेतलेल्या सीडीएस लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मैत्रेयीने अलाहाबाद येथे एसएसबी मुलाखत दिली. आता ती चेन्नईच्या लष्करी अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीत एक वर्षांचे सैनिकी प्रशिक्षण घेण्यासाठी पात्र ठरली असून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ती ‘लेफ्टनंट’ होईल, अशी माहिती तिचे मार्गदर्शक प्रदीप ब्राह्मणकर यांनी दिली.