मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात गिरणी कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या बैठकीला मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, धैर्यशील माने, आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, अतुल भातखळकर, सुनील राणे, प्रकाश आबिटकर, मंगेश कुडाळकर, प्रकाश आवाडे, माजी आमदार नरसय्या आडम, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह गिरणी कामगार संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित आहेत.
हेही वाचा >> गिरणी कामगारांच्या अडीच हजार घरांची सोडत मार्गी लागणार?
“गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी. मुंबईत घरे देता यावी याकरिता हौसिंग स्टॉक वाढविण्याची आवश्यकता आहे. रांजगोळी, कोन पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसंच, “गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत”, अशी ग्वाहीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
“गिरणी कामगारांच्या वारसांना हक्काची घरे मिळाली पाहिजेत ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. त्यासाठी कार्यवाहीला गती देण्यात आली असून गेल्या काही महिन्यांत दोन टप्प्यात गिरणी कामगारांना सदनिकेची चावी वाटप करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे १ लाख ७४ हजार अर्ज गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी म्हाडाकडे केले आहेत. त्याची छाननी प्रक्रिया अधिक गतिमान करण्याच्या सूचना दिल्या असून ही छाननी प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पात्र- अपात्र संख्या निश्चित होणार आहे”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.