सांगलीतील लाखभर बोगस मतदारांची पुणे मतदारसंघात नोंदणी केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर सांगली मतदारसंघात काँग्रेसच्या गोटातच अस्वस्थता निर्माण झाली असून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांनी हा आरोप बालिश असल्याची टीका केली असली तरी सांगलीचे कार्यकत्रे पुण्यात प्रचारासाठी कार्यरत असल्याचे नाकबूल केलेले नाही.
पुणे मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. सुरेश कलमाडी यांना डावलून ही उमेदवारी मिळाल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांत आनंदाची लहर निर्माण झाली होती. जिल्ह्यातील विश्वजित कदम यांच्यासह सदाभाऊ खोत (स्वाभिमानी शेतकरी संघटना) हेसुद्धा जिल्ह्याबाहेर जाऊन माढा मतदारसंघात आपले भवितव्य अजमावत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दोन कार्यकर्त्यांना जिल्ह्याबाहेर खासदारकीसाठी उमेदवारी मिळाल्याने लढतीबाबत उत्सुकता आहे.
पुणे मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने विश्वजित कदम निवडणूक मदानात असल्याने पलूस-कडेगावसह अवघ्या जिल्ह्याचे लक्ष पुण्यातील राजकीय हालचालींकडे लागलेले आहे. यातच फडणवीस यांनी सांगलीतील १ लाख ८ हजार मतदारांची नोंदणी पुणे मतदारसंघात करण्यात आल्याचा आरोप केल्यामुळे राजकीय चच्रेला ऊत आला आहे. अगोदरच जिल्ह्यातील काँग्रेसची जबाबदारी डॉ. कदम यांच्यावर असताना त्यांचे बहुतांशी लक्ष पुण्यात केंद्रित झाल्याने त्यांची जबाबदारी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव कदम यांच्यावर पडली आहे.
कदम कुटुंबीयांच्या दृष्टीने पुणे येथील विश्वजित कदम यांची उमेदवारी महत्त्वाची मानली गेल्याने पलूस-कडेगाव आणि जत विधानसभा मतदारसंघातील बहुतांशी कार्यकत्रे पुणे मतदारसंघात प्रचारासाठी कार्यरत आहेत. याचा फटका सांगलीत बसतो की काय अशी भीती व्यक्त होत असताना कोणत्याही स्थितीत या कार्यकर्त्यांचे मतदान सांगली संघात केले जाईल असा विश्वास डॉ. कदम यांनी दिला आहे. मात्र बोगस मतदारांचा आरोप झाल्याने पुन्हा एकदा अस्वस्थता निर्माण झाली असून वेगवेगळय़ा पातळीवर आज दिवसभर याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2014 रोजी प्रकाशित
पुण्यातील दुबार मतदारांमुळे सांगली काँग्रेसमध्ये अस्वस्थता
सांगलीतील लाखभर बोगस मतदारांची पुणे मतदारसंघात नोंदणी केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर सांगली मतदारसंघात काँग्रेसच्या गोटातच अस्वस्थता निर्माण झाली असून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
First published on: 13-04-2014 at 03:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaise in sangli congress