Devendra Fadnavis On Malegaon Blast Case Verdict : मालेगावमधील २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचा निकाल न्यायालयाने गुरूवारी दिला आहे. या प्रकरणात भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यासह सातही आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान, या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन काँग्रेस प्रणित यूपीए सरकारवर टीका केली आहे. ‘काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा, भगव्या दहशतवादाचा नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता, निवडणुकीत अल्पसंख्याकांचे लांगून चालन करण्यासाठी हिंदू दहशतवाद आहे, भगवा दहशतवाद आहे, अशा प्रकारचा प्रचार केला होता, तो प्रचार किती खोटा होता हे आज उघड झालं आहे. ज्या प्रकारे षडयंत्र रचून भगवा दहशतवाद दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. मात्र, तो प्रयत्न किती खोटा होता हे न्यायालयाने पुराव्यानिशी सांगितलं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

“खरं म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारणी ज्यांच्यावर यूपीए सरकारने कारवाई केली होती त्यांची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे. तसेच संपूर्ण हिंदू समाजाची देखील काँग्रेसने माफी मागितली पाहिजे. ज्या प्रकारे भगवा दहशतवाद दाखवून संपूर्ण हिंदू समाजाला दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे काँग्रेसने जाहीर माफी मागावी”, असं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

‘हा बॉम्बस्फोट कोणी केला? हे…’

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हा बॉम्बस्फोट कोणी केला? हे पोलीस सांगतील. तसेच त्या वेळच्या तपास यंत्रणांनी काय तपास केला? हे विचारावं लागेल. आता सर्वांना कल्पना आहे की उद्धव ठाकरे आता ज्यांच्याबरोबर बसलेले आहेत. त्यांचं सरकार (काँग्रेस) त्यावेळी होतं. त्यामुळे त्यांच्याच पोलिसांनी हे केलेलं आहे. भगव्या दहशतवादाचा नरेटीव्ह पसरवण्याचा हा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे. त्यामुळे त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन करायला पाहिजे होतं. पण आता तेही लांगून चालन करण्याच्याबरोबर गेलेले आहेत. त्यामुळे ते असं अभिनंदन करणार नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत आम्ही सविस्तर माहिती पाहू. या निर्णयात न्यायालयाने काय म्हटलं आहे ते आम्ही पाहू. पण आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार हे एक षडयंत्र होतं. तेव्हाच्या यूपीए सरकारने हे एक षडयंत्र तयार केलं होतं. ते षडयंत्र पूर्ण करण्यासाठी पोलिसांवर दबाव होता”, असा आरोपही फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

“आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा!”, मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली होती.

१७ वर्षांनी निकाल

मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत विशेष न्यायालयाने गुरूवारी निकाल दिला. हा निकाल देताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची पुराव्याअभावी सुटका केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाने निकाल देताना नेमकं काय म्हटलंय?

“बॉम्बस्फोट झाला, मात्र मोटरसायकलमधे झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आलं. आरडीएक्स प्रसाद पुरोहितने आणले हे सिद्ध होऊ शकलेलं नाही. त्याच्याविरुद्धचे आरोप सिद्ध झाले नाहीत. ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणाहून वैज्ञानिक पुरावे जमा केले गेले नाहीत. साध्वींच्या मोटरसायकलचा स्फोट झाल्याचा आरोप आहे. पण ही मोटरसायकल तिच्या मालकीची असल्याचे सिद्ध करण्यात अपयश आलं”, असं न्यायालयाने आरोपींची सुटका करताना स्पष्ट केलं.