Malegaon Bomb Blast Case : मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित बहुप्रतिक्षित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालय गुरूवारी निकाल दिला. हा निकाल देताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची पुराव्याअभावी सुटका केली. यानंतर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद हे म्हणू नका तर सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा असं विधान केलं आहे. तसंच आरोपी निर्दोष सुटणं हे तपास यंत्रणेचं अपयश आहे असंही चव्हाण म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
मालेगाव बॉम्बस्फोटाची घटना २००८ ची आहे. या घटनेला १७ वर्षे झाली आहे. बॉम्बस्फोट कुणीतरी केला आणि त्यात ८ लोकांचा मृत्यू झाला आणि १०० लोक जखमी झाले. मशिदीच्या शेजारी हा स्फोट झाला. मला एक टक्काही शक्यता वाटत नव्हती की वेगळा निकाल लागेल. हा निकाल असाच लागणार हे वाटत होतं. तसाच निकाल लागला.
ज्यांना सोडलं ते निर्दोष नाहीत तर पुरावे नसल्याने सुटलेत-पृथ्वीराज चव्हाण
२०० ते २५० साक्षीदारांची साक्ष नोंदवली. काहींनी साक्ष फिरवली. तपास ज्या दिशेने चालला होता त्यानुसार हा निकाल लागला आहे. न्यायालयात एनआयएने जी बाजू मांडली त्या आधारे निकाल दिला गेला आहे. आरोपींविरोधात पुरावा मिळाला नाही त्यामुळे या आरोपींना सोडलं आहे. स्फोट आपोआप झाला का? कट कुणी केला? आरडीएक्स कुणी आणलं? एनआयए अमित शाह यांच्या नेतृत्वात काम करतं आहे. त्यामुळे वेगळी काय अपेक्षा ठेवणार. जी माणसं मृत्यूमुखी पडली आहेत त्यांच्या कुटुंबांना तुम्ही काय सांगणार? अमित शाह यांच्या नेतृत्वात जोपर्यंत या तपास यंत्रणा काम करत आहेत तोपर्यंत हे असेच निकाल लागणार हे अपेक्षित आहे.
भगवा दहशतवाद म्हणू नका, हिंदुत्ववादी किंवा सनातनी दहशतवाद म्हणा-पृथ्वीराज चव्हाण
माझी हात जोडून विनंती आहे भगवा दहशतवाद हा शब्द वापरु नका. भगवा रंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याचा रंग आहे. तसंच तो वारकऱ्यांच्या झेंड्याचा रंगही भगवा आहे. त्यामुळे भगवा दहशतवाद असं कुणीही म्हणू नये. त्याऐवजी हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा किंवा सनातनी दहशतवाद म्हणा. भगव्या रंगाला महाराष्ट्रात वेगळं महत्त्व आहे त्यामुळे काँग्रेसच्या लोकांनाही माझी विनंती आहे. भगवा दहशतवाद म्हणू नका. दहशतवादाला धर्म, रंग काहीही नसतं. त्यामुळे त्याला कुठलाही रंग देऊ नका असं आवाहन मी करतो आहे असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
सर्वात पहिला दहशतवादी नथुराम गोडसे
सर्वात पहिला दहशतवादी कोण होता? तर तो नथुराम गोडसे होता. नथुराम गोडसे कुठल्या पक्षाचा होता? हिंदुत्ववादीच होता ना? मणिपूरमध्ये हिंसा झाली ते कुठल्या धर्माचे लोक आहेत? भाजपाने विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना यात गुंतवून टाकलं आहे. असू शकतील त्याविरोधात लढाईही केली पाहिजे. मालेगाव स्फोटात जे सुटले त्यांचा सत्कार होईल, हारतुरे घातले जातील. पण ज्यांचा मृत्यू झाला त्या कुटुंबांचं काय? असा सवालही पृथ्वराज चव्हाण यांनी विचारला आहे.