सोलापूर : अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस पक्षात मोठी पडझड होऊन, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे आपल्या अनुयायांसह शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्ष सावरण्यासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे सक्रिय झाल्या आहेत. पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी मल्लिनाथ महादेव पाटील यांची नियुक्ती करून पुनश्च हरिओम करण्यात आला आहे.नूतन तालुकाध्यक्ष मल्लिनाथ पाटील हे यापूर्वी १९८५ आणि १९९० अशा सलग दोनवेळा अक्कलकोटमधून विधानसभेवर निवडून गेलेले दिवंगत नेते महादेव काशीराया पाटील यांचे पुत्र आहेत. त्यांनीही जिल्हा परिषदेचे विषय समित्यांचे सभापतिपद सांभाळले होते. स्वतः काँग्रेस पक्षात सक्रिय असूनही ते ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशी जवळीक ठेवून आहेत.

अक्कलकोटच्या स्थानिक राजकारणात मल्लिनाथ पाटील हे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना साथ देत होते. परंतु, म्हेत्रे यांनी पक्षाची साथ सोडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश घेणे हे मल्लिनाथ पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्षा डॉ. सुवर्णा मलगोंडा, अशपाक बळोरगी, अरूण जाधव यांना रुचले नाही. या सर्वांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे.यापूर्वी पक्षाच्या तालुकाध्यक्षपद म्हेत्रे यांचे बंधू शंकर म्हेत्रे हे सांभाळत होते. ते शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे रिक्त झालेल्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी मल्लिनाथ पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे.