scorecardresearch

पोटच्या मुलीवर आधी लैंगिक अत्याचार, नंतर गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न; यवतमाळमधील धक्कादायक प्रकार!

मुलीनं हा सगळा प्रकार सुरू असताना गुप्तधनासाठीच्या खड्ड्याचा फोटो मित्राला पाठवल्यामुळे सगळा प्रकार उघड झाला!

human sacrifice in yawatmal news
गुप्तधनासाठी बापानं पोटच्या मुलीचा नरबळी देण्याचा केला प्रयत्न!

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मुद्द्यावर सातत्याने मोठी चर्चा होताना दिसत असताना अशा घटना अद्याप थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अजूनही अशा प्रकारांना नागरीक मोठ्या संख्येनं बळी पडत असल्याचं चित्र दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या यवतमाळमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका बापानंच आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आणि नंतर तिला गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. मुलीनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी नराधम बापासह एकूण ९ जणांना अटक केली आहे.

ही संतापजनक घटना बाभूळगाव तालुक्यात रविवारी रात्री उघडकीस आली. पोलीस वेळेत घटनास्थळावर पोहोचल्याने नरबळीचा हा डाव उधळला गेला. या प्रकरणी वाल्मिक रमेश वानखेडे (३३), विनोद नारायण चुनारकर (४२), दीपक मनोहर श्रीरामे (३१), आकाश शत्रूघन धनकसार (३४), माधुरी विजय ठाकूर (३०), माया प्रकाश संगमनेरकर (३५) सर्व रा. राळेगाव यांच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं घडलं काय?

बाभूळगाव तालुक्यातील तरुणी यवतमाळमध्ये काकांकडे शिक्षणासाठी राहते. ही तरुणी १३ वर्षांची असल्यापासून सुट्टीत घरी आल्यावर आरोपी बाप तिच्यावर अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला आहे. विरोध केला तर आई व बहिणीसह जिवे मारून टाकण्याची धमकी वडिलांनी दिल्याचं देखील तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे.

१५ दिवसांपूर्वी प्रकृती ठीक नसल्यामुळे तरुणी औरंगाबाद येथून घरी आली. त्यावेळी आईची प्रकृती बिघडल्याने तिला यवतमाळ येथे रुग्णालयात भरती करण्यात आले. तिचे वडील दवाखान्यातच राहात होते. तरुणी लहान बहिणीसह घरी होती. आठ दिवसांपूर्वी आई दवाखान्यातून घरी आली. दरम्यान दोन ते तीन दिवसांपासून तरुणीचे वडील गुप्तधनाबाबत फोनवर काही लोकांसोबत चर्चा करीत होते. घरात चिडचिड करून तरुणीसह बहिणीला मारहाण करीत होते. २४ एप्रिल रोजी रात्री कामाच्या कारणावरून तरुणीच्या वडिलांनी दोन्ही बहिणींना मारहाण केली. ‘तुझ्या सारखी मुलगी जिवंत ठेऊन काहीच उपयोग नाही’, असं म्हटल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं आहे.

…आणि नराधमानं पोटच्या मुलीचा नरबळी देण्याचं ठरवलं!

२५ एप्रिल रोजी सकाळपासून तरुणीचे वडील गुप्तधनाबाबत फोनवर बोलत होते. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता वडिलांनी तरुणीस ‘तू आंघोळ करून तयार राहा, आपल्याकडे माणसं येणार आहेत’, असं बोलून घराच्या मागची खोली साफ केली. त्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास घरी गावातील विजय बावणे (४१), शेतात काम करणारा रमेश गुडेकार (५०) व बाहेरगावातील चार पुरुष व दोन महिला आल्या. सर्वजण मागच्या खोलीत गेले. त्यावेळी आई, लहान बहीण बाजूच्या खोलीत थांबून होते. वडिलांनी दरवाजा लावायला सांगितला व तू आता बाहेर यायचे नाही, तुझे येथे काम पडणार आहे, असे म्हटले. त्यानंतर चर्चा सुरू असताना त्यातील एकाने गुप्तधनासाठी एका व्यक्तीचा नरबळी आवश्यक आहे, असे म्हटले. वडिलांनी मोठ्या मुलीचा बळी देण्यास तयारी दर्शविली.

वारंवार वाल्मिक बाबा अशा नावाने मांत्रिकाला मुलीचे वडील हाका मारत होते. त्यांच्या बोलण्यातून ते सर्वजण राळेगाव येथून आल्याचे तरुणीच्या लक्षात आले. वडिलांनी बहीण, आई व तरुणीच्या हातात एक-एक लिंबू दिला आणि परत ते त्या खोलीत गेले. हा संपूर्ण प्रकार तरुणी लपून बघत होती. त्या दोन महिलांच्या हाताने जागेची पूजा करण्यात आली. वडिलांनी जबरदस्तीने तरुणीला त्या खोलीत नेले व तेथे सर्वांनी तरुणीची पूजा केली. गळ्यात फुलांचा हार टाकला. त्याचवेळी पोलीस आले व त्यांनी सर्व प्रकार थांबवून तरुणीचा जीव वाचवला.

मित्रामुळे जीव वाचला!

हा प्रकार सुरू असताना तरुणीने मोबाइलमध्ये लपून गुप्तधनासाठी खोदलेल्या खड्ड्याचा फोटो काढला व यवतमाळ येथील मित्र सचिन मेश्राम याला फोटो पाठवून व ‘बळी जाण्याची शक्यता आहे. मला वाचव’ असा संदेश पाठवला. तरुणाने स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस बाभूळगावात पोहोचले. स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठून ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे मित्राच्या सतर्कतेने तरुणीचा बळी जाण्यापासून वाचला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man rapes daughter tries to human sacrifice her for hidden treasure pmw

ताज्या बातम्या